
मविआ सभा
`महाविकास’ ची २८ मे रोजी कोल्हापुरात सभा
राज्यभराचे नियोजन जाहीर ः लोकसभा निवडणुकीपूर्वी वातावरण तापवण्याचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात एकत्र आलेल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या राज्यभर होणाऱ्या सभांचे नियोजन झाले असून कोल्हापुरात ही सभा २८ मे रोजी होणार आहे. या सभांना शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची उपस्थिती असणार आहे.
राज्यात २०१९ च्या विधानसभा झाल्यानंतर शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जून २०२२ मध्ये सरकार पडले आणि शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार सत्तेवर आले. या सरकारविरोधातील सर्व निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत यापूर्वीच झाला आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यापूर्वी सरकार विरोधात रान उठवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येक जिल्ह्यात सभा घेण्याचे नियोजन झाले आहे. त्यानुसार या सभांची सुरूवात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधून १ एप्रिलपासून होत आहे.
ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाच्या नेत्यांची ताकद मोठी आहे, त्यांच्यावर या सभांचे नियोजन सोपवण्यात आले आहे. त्यानुसार कोल्हापुरात २८ मे रोजी होणाऱ्या सभेच्या नियोजनाची जबाबदारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याकडे दिली आहे. सभेचे स्थळ निश्चित करण्यापासून ते सर्व व्यवस्था श्री. पाटील यांना करावी लागणार आहे. त्यांना काँग्रेसच्या इतर नेत्यांसह शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते मदत करतील.
१ एप्रिल ते ११ जून या काळात या सभा होणार आहेत. त्यात नागपूर, मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती याठिकाणी या सभा होतील. सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील आजी-माजी मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
........