
जातीवाचक शिवीगाळ दोघांवर गुन्हा दाखल
जातीवाचक शिवीगाळ, दाम्पत्यावर गुन्हा दाखल
कोल्हापूर, ता. १५ः फुलेवाडी रिंगरोड येथील दाम्पत्याकडून जातीवाचक शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाल्याची फिर्याद करवीर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. त्यानुसार रमेश चौगुले आणि अश्विनी रमेश चौगुले (दोघेही रा. शिवदत्त कॉलनी, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती करवीर पोलिसांनी दिली. जातीवाचक गुन्हा असल्यामुळे अधिक तपास करवीरचे पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी करीत आहेत.
पोलिसांनी सांगितले, की फिर्यादी पूजा सागर शिंदे या गृहिणी आहेत. त्या फुलेवाडी रिंगरोड येथे राहतात. त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचा परतावा मागण्यासाठी त्या रमेश चौगुले यांच्या घरी गेल्या असताना त्यांना या दाम्पत्याने जातीवाचक शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. फुलेवाडी रिंगरोड येथील शिवदत्त कॉलनीमध्ये तीन मार्चला ही घटना घडली. दरम्यान, शिंदे यांनी रमेश चौगुले याच्या मध्यमातून गुंतवणूक केली आहे. त्यातून काही महिन्यानंतर मिळत असलेला परतावा थांबल्यामुळे किमान गुंतवलेली मूळ रक्कम परत मागणीसाठी शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्याकडून अपेक्षीत प्रतिसाद दिला जात नव्हता. त्यामुळे त्या थेट त्यांच्या घरी गेल्या. तेथे रमेश चौगुले याने शिंदे यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच अश्विनी चौगुले हिने धक्काबुक्की करून मारण्याची धमकी दिली. त्यामुळे शिंदे यांनी दिलेल्या जातीवाचक शिवीगाळ आणि धमकीच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा संदर्भ गुंतवणुकीचा असला तरीही जातीवाचक शिविगाळ या गुन्ह्याचा तपास करीत असल्याची माहिती तपास अधिकारी गोसावी यांनी दिली.
-