भाजपच्या नव्या कार्यकारणीचा मुहूर्त मार्च अखेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपच्या नव्या कार्यकारणीचा मुहूर्त मार्च अखेर
भाजपच्या नव्या कार्यकारणीचा मुहूर्त मार्च अखेर

भाजपच्या नव्या कार्यकारणीचा मुहूर्त मार्च अखेर

sakal_logo
By

(कमळ चिन्हाचा लोगो वापरणे)
...

नव्या कार्यकारिणीला मार्चअखेरचा मुहूर्त

प्रदेश भाजपकडून चाचपणी सुरू ः अधिवेशनानंतर होणार घोषणा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १५ ः भारतीय जनता पक्षाच्या महानगर (शहर) आणि ग्रामीण या दोन्ही जिल्हा कार्यकारिणीत मोठे बदल होणार आहेत. या महिन्याच्या अखेरीस राज्याचे अधिवेशन झाल्यावर हे बदल करण्यात येतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. नव्या कार्यकारिणीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असून काही जुन्या मंडळींकडे नवी पदे देण्यात येणार आहेत.
भारतीय जनता पक्षात दर तीन वर्षांनी राष्ट्रीयस्तरापासून ते स्थानिक पातळीपर्यंत कार्यकारणी बदलली जाते. या नियमानुसार आता नवी कार्यकारणी घोषित करण्यात येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून याची तयारी सुरू असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी याचे सूतोवाच केल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ‘ कोल्हापूर उत्तर ’च्या पोटनिवडणुकीनंतर हे ‘बदलाचे वारे’ पक्षात वाहू लागले. सध्या अजित ठाणेकर, सचिन तोडकर, विजय जाधव आणि विजय सूर्यवंशी हे शहराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. यातील काही जणांनी पक्षातील पदाधिकारी आणि प्रदेशातील वरिष्ठ यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण कार्यकारणीत माजी आमदार अमल महाडिक, राजवर्धन निंबाळकर आणि नाथाजी पाटील यांची नावे चर्चेत आहेत. मात्र सध्याचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना मुदतवाढ मिळेल, असे वरिष्ठांकडून सांगण्यात येते. सध्या विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे. ते संपल्यावर लगेचच राज्य पातळीवर कार्यकारणी बदलाचे काम सुरू होईल. प्रदेश कार्यकारणीतही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष पदासाठी प्रदेश पदाधिकाऱ्यांकडून चाचपणी सुरू आहे. कार्यकर्त्यांना काय वाटते, जिल्ह्यातील नेत्यांच्या मनात कोणती नावे आहेत. तसेच पक्षाच्या हितचिंतकांना काय वाटते याचा अंदाज घेण्याचे काम प्रदेश पदाधिकारी करत आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीस या नियुक्त्या होतील, असे सांगण्यात येत आहे.
-------------------------------------------------------
‘त्या’ अहवालाचा विचार होणार

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी काम केले होते. त्याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आला आहे. नव्या कार्यकारणीची घोषणा करताना या अहवालातील नावांना वगळण्यात येईल, असे प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मत आहे.
----------

नव्या नेत्यांनाही संधी

गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यात प्रभाव असणारे संग्रामसिंह कुपेकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनाही जिल्हा कार्याकराणीत महत्त्वाचे स्थान देण्यात येईल. तसेच स्थानिक पातळीवर जे नेते नव्याने पक्षात आले आहेत त्यांचाही विचार होईल.