
थोरात यांना ऐकून ‘कोल्हापूर भेट सार्थकी’ लागली
फोटो-89331
...............
डॉ. थोरात यांना ऐकून
कोल्हापूर भेट सार्थकी
मुणगेकर यांची भावना; शिवाजी विद्यापीठातील व्याख्यानाप्रसंगी मानवंदना
कोल्हापूर, ता. १५ : शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि राजर्षी शाहू संशोधन केंद्रातर्फे आयोजित राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषदेच्या पहिल्या सत्रात ‘राजर्षी शाहू आणि युरोपियन विचारविश्व’ या विषयावर नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी आज मांडणी केली. त्यांचे व्याख्यान झाल्यानंतर व्यासपीठावर जाऊन ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी ‘डॉ. थोरात यांना ऐकल्यानंतर माझी कोल्हापूर भेट सार्थकी लागली,’ अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
डॉ. थोरात यांनी या व्याख्यानात एकेक मुद्दा ठेवत त्याच्या शक्याशक्यतांची सर्वंकष चर्चा करत मांडणी केली. ती इतकी प्रभावी ठरली की, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासह मानव्यशास्त्र सभागृहात उपस्थित मान्यवरांनी व्याख्यान संपल्यानंतर उभे राहून त्यांना मानवंदना दिली. दरम्यान, या व्याख्यानात राजर्षी शाहू महाराजांच्या जडणघडणीत त्यांचे गुरू सर स्टुअर्ट फ्रेझर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. फ्रेझर यांनी तेरा वर्षांमध्ये अवघ्या तीन राजकुमारांना शिकविले. त्यामध्ये शाहू महाराजांसह भावनगरचे भावसिंगजी महाराज आणि म्हैसूरचे कृष्णराज वाडियार यांचा समावेश होता, असे डॉ. थोरात यांनी सांगितले. शाहू महाराजांवर त्यांच्या शिकवणीचा खूप मोठा प्रभाव पडला. हे गृहितक सिद्ध करताना त्यांनी भावनगर आणि म्हैसूरच्या राजांनी केलेल्या कामगिरीचा दाखला दिला. शाहू महाराज, भावसिंगजी महाराज आणि कृष्णराज महाराज यांच्या कार्यामागील समप्रेरणा कोण असतील, तर ते म्हणजे त्यांचे गुरू सर स्टुअर्ट फ्रेझर होय, असे सिद्ध करता येऊ शकते. या विषयाच्या अनुषंगाने अधिक संशोधन होण्याची नितांत गरज असल्याचे मत डॉ. थोरात यांनी व्यक्त केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.