रेड्यांचा बळी थांबवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेड्यांचा बळी थांबवला
रेड्यांचा बळी थांबवला

रेड्यांचा बळी थांबवला

sakal_logo
By

खणदाळ यात्रेतील रेड्यांचा
बळी पोलिसांनी थांबविला

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता.१५ : खणदाळ (ता. गडहिंग्लज) येथे सुरू असलेल्या श्री महालक्ष्मी यात्रेत दोन रेड्यांचा बळी दिला जाणार असल्याची चर्चा ऐकून हा प्रकार थांबविण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार आज दुपारी रेड्यांचा बळी थांबविल्याचे पोलिसांनी सांगितले.
खणदाळ येथे दर पाच वर्षांनी महालक्ष्मी यात्रा भरते. यंदा १४ मार्चपासून ही यात्रा सुरू झाली आहे. आज (दि.१५) यात्रेचा मुख्य दिवस होता. याच दिवशी दुपारी साडेबाराच्या सुमारास रेड्यांचा बळी दिला जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गडहिंग्लज शाखा उपाध्यक्ष साधना आयवाळे, कार्याध्यक्ष राजेंद्र पताडे, प्रधान सचिव शशिकांत चौगुले, युवा कार्यवाह हेमा दोडके, क्रांती कुंभार, तानाजी कुरळे यांनी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, परिविक्षाधीन अप्पर जिल्हाधिकारी श्रद्धा बुधवंत व पोलिस प्रशासनाला निवेदन दिले होते. शासनाने प्राणीरक्षा अधिनियमाद्वारे पशुबळीला बंदी घातली असून, खणदाळ येथे होणाऱ्या रेड्यांच्या बळीला बंदी घालावी, अशी मागणी निवेदनातून केली होती.
दरम्यान, या निवेदनाची दखल घेऊन बुधवंत यांनी पत्राद्वारे पोलिस प्रशासनाला हा प्रकार थांबविण्याची सूचना केली होती. त्यानुसार मंगळवारीच पोलिसांनी यात्रा समितीला हा प्रकार टाळण्याचे आवाहन केले होते, परंतु आज पुन्हा बळीची चर्चा सुरू झाल्याने सकाळपासूनच पोलिस निरीक्षक गजानन सरगर, सहायक पोलिस निरीक्षक रोहित दिवसे, उपनिरीक्षक शीतल सिसाळ व कर्मचारी गावात तळ ठोकून होते. रेड्यांचा बळी रोखण्यासाठी पोलिस लक्ष ठेवून होते. यामुळे हा प्रकार थांबला. दरम्यान, गावातून दोन्ही रेड्यांची केवळ मिरवणूक काढून त्यांना सोडून दिल्याचे यात्रा समितीच्या सूत्रांनी सांगितले.
......................