
जुनी पेन्शन लागू तरीही कर्मचारी संपात
जुनी पेन्शन लागू
तरीही कर्मचारी संपात
इचलकरंजी मनपामधील प्रकार; शिस्तभंगाच्या कारवाईचा आयुक्तांचा इशारा
इचलकरंजी, ता. १५ ः जुनी पेन्शन लागू करण्यासाठी सध्या शासकीय, निमशासकीय कर्मचा-यांचा संप सुरु आहे. पण जुनी पेन्शन लागू असणारे सुमारे ५०० हून अधिक इचलकरंजी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी संपात उतरले आहेत. ही बाब समोर आल्यानंतर आज आयुक्त सुधाकर देशमुख यांनी एक परिपत्रक काढीत संबंधितांनी तातडीने कामावर रुजू होण्याबाबत आवाहन केले आहे. जे कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
इचलकरंजी महापालिकेकडील तब्बल ९५० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता महापालिकेच्या सर्व विभागाचे कामकाज ठप्प आहे. यापूर्वीच आयुक्त देशमुख यांनी संपात सहभागी न होण्याबाबत अधिकारी व कर्मचारी यांना आवाहन केले होते. मात्र त्यानंतरही बहुतांशी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यास आयुक्त देशमुख यांनी सुरुवात केली आहे. जे जुनी पेन्शन लागू नसणारे कर्मचारी कामावर रुजू न झाल्यास ते कारवाईस पात्र असतील, अशी समज परिपत्रकाव्दारे दिली आहे.
दुसरीकडे जुनी पेन्शन लागू असतांनाही संपात सहभागी झालेल्यांवरही आयुक्तांनी ताशेरे ओढले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू असतांना संपात सहभागी होण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे सहभागी झालेल्यांना तातडीने कामावर रुजू होण्याबाबत विभागप्रमुखांनी सूचना द्यावी, असे आदेश आयुक्तांनी आज दिले आहेत. जे कर्मचारी त्यानंतरही कामगार रुजू होणार नाहीत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे जूनी पेन्शन लागू असणारे सुमारे ५०० हून अधिक महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी झाल्याची माहिती आस्थापना विभागाकडून देण्यात आली.