
धरणग्रस्त
89351
....
आंदोलन उद्यापासून तीव्र करणार
डॉ. भारत पाटणकर : पुढील दिशा चर्चेनंतर
कोल्हापूर, ता. १५ : ‘प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर सरकारचे अधिकारी बोलण्यास तयार आहेत. त्याची तारीख ठरेपर्यंत आंदोलन तीव्र केले जाणार आहे. सरकारशी चर्चा झाल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. मंत्रालयीन पातळीवर विषय जरी सुटले तरीही स्थानिक प्रश्नांबाबत आंदोलन कायम राहील’, असे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मारुती पाटील यांनी सांगितले. दरम्यान, डॉ. भारत पाटणकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सर्व विषयांवर चर्चा केली.
पाटणकर म्हणाले, ‘सोमवारी (ता.१३) मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांनी व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली होती. मात्र धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रत्यक्ष चर्चा होणे अपेक्षित आहे. आज ही बैठक होणार होती, पण सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे होऊ शकली नाही. मात्र, मंत्रालयात यावर प्रत्यक्ष तोडगा निघत नाही, तोपर्यंत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार नाही. सध्या सुरू असेलले आंदोलन तीव्र केले जाईल. दरम्यान, प्रधान सचिवांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची अंतिम बैठक होऊन निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. जनतेने वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना मतदान केले आहे. काही लोकप्रतिनिधींनी आंदोलनाला भेटी दिल्या. परंतु मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊन बैठक घेण्यासाठी त्यांनी पुढे काही केलेले नाही. त्यामुळे ते आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात काय करणार आहेत ते विचारण्यासाठी आंदोलक जनता त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत.’
दरम्यान, डॉ. पाटणकर, संतोष गोटल, शोभा माने, जी. गुरुप्रसाद यांच्या हस्ते अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांना निर्वाह भत्ता व ६५ टक्के रकमेवरील व्याजाच्या धनादेशांचे वाटप केले. यावेळी यावेळी अभयारण्य विभागाचे प्रकल्प अधिकारी जी. गुरुप्रसाद, रमेश कांबळे, साताप्पा जाधव व त्यांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्यालय प्रमुख संतोष गोटल, जिल्हाध्यक्ष मारुती पाटील, डी. के. बोडके, शामराव कोठारी, विनोद बडदे उपस्थित होते.