न्यायालयाच्या दिलाशानंतर 
हसन मुश्रीफांची ईडीकडून चौकशी

न्यायालयाच्या दिलाशानंतर हसन मुश्रीफांची ईडीकडून चौकशी

मुश्रीफ यांची आठ तास चौकशी
मागणीनुसार सर्व प्रक्रियेचे ऑडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग
मुंबई, ता. १५ : मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईसंदर्भात दिलासा दिल्यानंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे आठ तास चौकशी केली. दुपारी साडेबारा ते रात्री साडेआठपर्यंत चौकशी सुरू होती. या दरम्यान, माझ्या चौकशीचे ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे, असे पत्र मुश्रीफ यांनी ईडीला दिले. या पत्रात चौकशी दरम्यान काही मागण्या केल्या होत्या. त्यांच्या या मागण्या ईडीकडून मान्य करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मागणीनुसार त्यांच्या चौकशीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात आहे.
श्री. मुश्रीफ यांना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला होता. मुश्रीफ यांना दोन आठवडे अटक करू नये, असे आदेशच दिले होते. हसन मुश्रीफ यांच्यावरील अटकेची टांगती तलवार दोन आठवड्यांपुरती दूर झाली; परंतु त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले असल्याने बुधवारी मुश्रीफ ईडी कार्यालयात पोहचले. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना पत्र दिले. त्यात मुश्रीफ यांनी आपल्या सुरू असलेल्या चौकशीचे ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे, असे पत्रात म्हटले आहे. वकिलांना अतित सोनी आणि प्रशांत पाटील यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आणि दृश्यमान अंतरावरुन आणि लेखापरीक्षण करण्यायोग्य अंतरावरून या प्रक्रियेस उपस्थित राहण्याची अनुमती पत्राद्वारे करण्यात आली होती.

ईडीचे सहकार्य
चौकशीनंतर रात्री पावणेनऊ वाजता बाहेर पडल्यावर मुश्रीफ ईडी कार्यालयाच्या बाहेर पत्रकारांना म्हणाले, ‘‘दुपारी साडेबाराला ईडीच्या मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर झालो. सव्वाआठ तासांच्या चौकशीत अतिशय योग्य व चांगल्या पद्धतीने उत्तरे देऊन चौकशीला सामोरे जात सहकार्य केले आहे. सोमवारी (ता. २०) दुपारी १२.३० वाजता पुन्हा बोलविले आहे. त्यावेळीही चौकशीला हजर राहून सहकार्य करू. काय -काय आणि कशा प्रकारचे प्रश्न होते, यावर आत्ता बोलणे योग्य नाही. परंतु; चांगल्या पद्धतीने आम्ही उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचे संपूर्ण समाधान होईल.’’

मी चुकीचे काहीच केले नाही!
तब्बल सव्वाआठ तास तुमची चौकशी झाली, तरीही तुम्ही इतके फ्रेश आणि आनंदी दिसत आहात. ही चौकशी आनंदी, हसत -खेळत झाली आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नावर श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘मी चुकीचे काहीच केलेले नाही. त्यामुळे चौकशी अतिशय चांगली झाली. ईडीनेही चांगले सहकार्य केले. आम्हीही त्यांना सहकार्य केले.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com