
मार्च एंड पण, कामकाज थंड!
gad161.jpg
89414
गडहिंग्लज : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)
---------------------------
मार्च एंड पण, कामकाज थंड!
कर्मचारी संपाचा परिणाम; गडहिंग्लजला निघाला मूक मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ : जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपावर तोडगा निघालेला नाही. शासकीय-निमशासकीय कर्मचारी संपात सहभागी असल्याने शासकीय कार्यालयीन कामकाज ठप्प आहे. नेहमी मार्च महिन्याच्या अखेरीस शासकीय कार्यालयात धावपळ असते. मात्र, संपामुळे ऐन मार्च एंडला कामकाज थंड पडल्याचे चित्र आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी आज प्रांत कार्यालयावर मूक मोर्चा काढत मागण्यांकडे लक्ष वेधले.
आर्थिक वर्षाच्या शेवट मार्च महिन्याने होतो. त्यामुळे या महिन्यात शासकीय कर्मचाऱ्यांची धावपळ चालते. कर रुपातील महसूल जमा करणे, शासकीय योजनांचा निधी खर्च करण्यासह शासनाकडून विविध विभागांना योजनांची उद्दिष्ट दिलेली असतात. ती मार्चअखेरीस पूर्ण करावी लागतात. यासाठी कर्मचाऱ्यांची धडपड सुरू असते. मात्र, हे नेहमीचे चित्र शासकीय कार्यालयात सध्या दिसत नाही. या साऱ्या कामांची जबाबदारी असणारे कर्मचारीच संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामकाज थंड झाले आहे.
दरम्यान, संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आज मूक मोर्चा काढला. सकाळी साडेअकराला पंचायत समितीपासून मूक मोर्चाला प्रारंभ झाला. कचेरी रोड, मुख्य मार्ग, लक्ष्मी रोड, बाजारपेठ, वीरशैव चौक, संकेश्वर मार्ग, मुख्य मार्गावरुन फिरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. भर उन्हात हा मोर्चा निघाला. महिला कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. कर्मचाऱ्यांनी दंडाला काळ्या फिती लावल्या होत्या. काही कर्मचाऱ्यांनी काळे मास्क तोंडाला लावत शासनाचा निषेध केला. मोर्चात सहभागी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी होती. पण, मूक आंदोलनामुळे शांतता होती. कर्मचाऱ्यांनी प्रांत कार्यालयासमोरच बैठक मारली. सुमारे अर्धा तास कर्मचारी बसून होते. या कालावधीत मुख्य मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविली होती. पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त होता.
----------------
* उद्याचा ताण...
संपात कर्मचारी सहभागी असल्यामुळे मार्च एंडिंगची धावपळ थंड आहे. पण, कर्मचाऱ्यांना संप मिटल्यानंतर आपापली उद्दिष्ट पूर्ण करावीच लागणार आहेत. आजचा संप आणि उद्याचा ताण अशी ही परिस्थिती आहे. संप किती दिवस चालणार त्यावर ताणाची तीव्रता अवलंबून आहे.