
स्थानिक कलाकारांच्या मैफलीने आजरेकर मंत्रमुग्ध
ajr162.jpg
89446
आजरा ः येथील बाजार मैदानात झालेल्या स्वरमैफलीमध्ये अर्णव बुवा यांनी गीत सादर केले. कलाकार उपस्थित होते. (श्रीकांत देसाई, आजरा)
-------------------
स्थानिक कलाकारांच्या मैफलीने आजरेकर मंत्रमुग्ध
रसिकांकडून उत्स्फूर्त दाद; स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १७ ः या जन्मावर... या जगण्यावर... शतदा प्रेम करावे...., हे सुरांनो चंद्र व्हा.., रेशमांच्या रेघांनी... लाल काळ्या धाग्यांनी.., अशा भावगीते, नाट्यगीते, लावणी, भक्तिगीतांच्या एकापेक्षा एक सादरीकरणामुळे आजरेकर रसिक मंत्रमुग्ध झाले. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या गीतांनी रसिकांना खुर्चीला खिळवून ठेवले. रसिकांकडून कलाकारांना उत्स्फूर्त दाद मिळाली. निमित्त होते स्वामी विवेकांनद पतसंस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित ‘आपली माणसं, आपली गाणी’ या कार्यक्रमाचे.
येथील बाजार मैदानात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मार्गदर्शक महादेव टोपले होते. संस्थेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर मुंज, मलिककुमार बुरुड, माजी सरपंच अरुण देसाई यांच्याहस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. जनता बॅंक लि., आजराच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महादेव टोपले यांचा सत्कार झाला. प्रा. डॉ. मुंज म्हणाले, ‘‘गायन व संगीताच्या क्षेत्रातील स्थानिक कलाकार एकत्र येत आहेत. ही चांगली गोष्ट असून आजरेकरांना स्वरमैफलीची रसिकांना चमचमीत मेजवानीच आहे.’’ केदार सोहनी, चिन्मय कोल्हटकर, शुभदा सबनीस, अर्णव बुवा, अभिषेक देशपांडे, सीमा सोनार, अजित तोडकर यांनी विविध गीते सादर करत मैफलीला उंची प्राप्त करून दिली. अडीच तास चाललेल्या स्वरमैफिलीची सांगता समीर देशपांडे यांनी गायिलेल्या ‘जय.. जय...महाराष्ट्र माझा’ या गीताने झाली.
शब्द सुरांच्या झुल्यावरचे प्रमुख सुनील सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश कोळी, डॉ. ओमकार गिरी, डॉ. कृष्णा होरांबळे, रघुनंदन ऐतावडेकर, रमेश नलवडे, अशोक बनगे यांनी संगीत साथ दिली. जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, आजरा अर्बन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, संचालक डॉ. दीपक सातोसकर, पतसंस्थेचे संचालक आदी उपस्थित होते. सरव्यवस्थापक अर्जुन कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
----------------
* आजऱ्यात अभ्यासिका सुरू करणार
स्वामी पतसंस्थेच्या वतीने गरीब, गरजू विद्यार्थांसाठी अद्यावत अशी अभ्यासिका सुरु करणार असल्याची घोषणा अध्यक्ष श्री. टोपले यांनी या वेळी केली.