
देवीभक्त सकल समाज पत्रकार परिषद
श्री अंबाबाईचे नित्योपचार
तत्काळ सुरू करा
देवीभक्त सकल हिंदू समाजाची मागणी
कोल्हापूर, ता. १६ ः मूर्तीची झीज होत असल्याच्या कारणामुळे पुरातत्त्व खात्याच्या निर्देशानुसार १९९७ पासून श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवर स्नान-अभिषेक आदी नित्योपचार परंपरा बंद करण्यात आली आहे. सद्यस्थितीत मंगळवारी (ता. १४) केंद्रीय पुरातत्व खात्याने श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची पहाणी केल्यानंतर मूर्ती सुस्थितीत असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे मूर्तीवरील स्नान - अभिषेक आदी नित्योपचार परंपरा चालू करावी, अशी मागणी देवीभक्त सकल हिंदू समाजाने आज पत्रकार परिषदेत केली.
देवीभक्त सकल हिंदू समाजाचे शरद माळी म्हणाले, ‘हिंदू धर्म शास्रानुसार मूर्तीमधील चैतन्य जागृत रहाण्यासाठी कोणत्याही देवतेवर स्नान-अभिषेक आदी नित्योपचार परंपरा चालू असणे अत्यावश्यक असते. ही परंपराच बंद असल्याने देवीभक्तांच्या श्रद्धांचे हनन होत आहे. पुरातत्त्व खात्याने मूर्तीची स्थिती चांगली नसून, मूर्तीची झीज रोखण्यासाठी आणि मूर्ती संवर्धन होण्यासाठी मूर्तीस रासायनिक लेपन करण्याचा उपाय सांगितला होता. त्यानुसार पुरातत्व खात्याकडून रासायनिक लेपन करण्यातही आले; मात्र तरीही मूर्तीची झीज झाल्याचे वृत्त आले. मात्र पुरातत्त्व खात्याने दिलेल्या निर्वाळ्यानंतर मूर्तीवरील नित्योपचार त्वरित सुरू करावेत.’ यावेळी राजू यादव, सुमेध पोवार, रामभाऊ मेथे, शिवानंद स्वामी उपस्थित होते.