
शिवाजी विद्यापीठ, लोणेरे, परभणी, नागपूर संघ विजयी
शिवाजी विद्यापीठ लोगो
--
लोगो- कर्मचारी कुलगुरु चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा
-
शिवाजी विद्यापीठ, लोणेरे, परभणी, नागपूर संघ विजयी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरु चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. त्यात आज चौथ्या दिवशी यजमान शिवाजी विद्यापीठासह लोणेरे, परभणी, नागपूर संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.
आजच्या पहिल्या सामन्यात शिवाजी विद्यापीठाच्या संघाने नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर ६ गडी राखून विजय मिळविला. नाशिक संघाने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. या संघाने २० षटकात ९ बाद १२३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना शिवाजी विद्यापीठाने १६.४ षटकात ४ बाद १२७ धावा केल्या. विक्रम कोंढावळे सामनावीर ठरला. दुसऱ्या सामन्यात लोणेरेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठावर नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठावर ६६ धावांनी मात केली. लोणेरे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १६६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल नाशिकचा संघ २० षटकात १० बाद १०० धावाच करू शकला. ओंकार बोदिळकर सामनावीर ठरला. दुपारच्या दुसऱ्या सामन्यात नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठावर ४ गडी राखून जिंकला. नागपूरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. जळगाव संघाने २० षटकात ६ बाद १५४ धावा केल्या. नागपूरने हे आव्हान ६ गड्यांच्या मोबदल्यात १५.४ षटकात पार केले. अजित माळी सामनावीर ठरले.
चौकट
शिवाजी विद्यापीठ-ब संघाचा पराभव
दुपारच्या सत्रात शिवाजी विद्यापीठ-ब आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्यात सामना झाला. हा सामना परभणीने तब्बल ९ गडी राखून जिंकला. शिवाजी विद्यापीठ-ब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १२.३ षटकात सर्वबाद ९६ धावा केल्या. परभणी संघाने अवघ्या एका गड्याच्या मोबदल्यात ९.५ षटकात ९८ धावा केल्या. त्यात मनोज कऱ्हाळे यांच्या ४७ धावांचा समावेश राहिला. सामनावीर त्यांनाच घोषित करण्यात आले.