
आत्महत्येस प्रवृत्त प्रकरणी तरुणाला अटक
89603
----
बोंद्रेनगर येथील मुलीच्या
आत्महत्येप्रकरणी तरुणास अटक
आई-वडिलांसह तिघांवर गुन्हा दाखल ः मुलीला त्रास दिल्यामुळे आत्महत्या केल्याची आईची फिर्याद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ बोंद्रेनगर परिसरातील मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी आज तरुणाला अटक केली. मारुती हरी बोडेकर (वय २४, रा. बोंद्रेनगर, फुलेवाडी रिंगरोड) असे त्याचे नाव आहे. तर त्याच्यासह आई विठाबाई आणि आणि वडील हरी बोडेकर यांच्यावरही गुन्हा दाखल केल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली. याबाबतची फिर्याद मुलीची आई शांताबाई शाहू बोडेकर यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार ही कारवाई केल्याचे निरीक्षक अरविंद काळे यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, परिसरातच राहणाऱ्या तरुणाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून काल दुपारी नकुशा साबू बोडेकर या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यावेळी नकुशाने लाल आणि निळ्या रंगाच्या शाईने लिहिलेल्या चिठ्ठीत ‘मारुती’ नावाचा संदर्भ होता. तसेच तिच्या आईनेसुद्धा दिलेल्या फिर्यादीत तरुण मारुती याच्यासह त्याच्या आई-वडिलांमुळे नकुशाने आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पोलिसांनी आज दुपारी साडेतीनच्या सुमारास बेपत्ता झालेल्या मारुती बोडेकर याला गगनबावडा या त्याच्या मूळ गावातून अटक केली.
मारुती बोडेकर हा १५ मार्च २०२० पासून नकुशा हिच्यावर प्रेम करत होता. तेंव्हापासूनच तो नकुशा हिचा पाठलाग करून वारंवार तिला त्रास देत होता. त्याच्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून नकुशा तीन दिवसांपूर्वी सावत्र आईकडून चुलत्याच्या घरी राहण्यास आली होती. तेथे काल दुपारी तिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या मृतदेहाजवळ मिळालेल्या चिठ्ठीनुसार मारुती बोडेकर हा तिला त्रास देत असल्याचे दिसून आले. तसेच काल नकुशाच्या नातेवाईकांना आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी अटक करण्याची ग्वाही दिल्यानंतर अंत्यसंस्कार केले होते.
दरम्यान, आज सकाळपासून नातेवाईक करवीर पोलिस ठाण्यात थांबून होते. त्यांनी तेथे सविस्तर फिर्याद दिली. त्यामध्ये संशयित आरोपी मारुती याच्याकडून नकुशीला त्रास दिला जात होता. तसेच दोन दिवसांपूर्वीच मारुतीच्या आई-वडिलांनीही तुझ्यामुळे माझ्या मुलाची बदनामी होत असल्याचे सांगून तुला आणि तुझ्या आईला सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. त्यामुळे मारुतीबरोबरच तिच्या आई-वडिलांवरही गुन्हा दाखल झाल्याचे निरीक्षक काळे यांनी सांगितले.