
गाव नकाशावरील रस्ते अतिक्रमणमुक्त करा
गाव नकाशावरील रस्ते
अतिक्रमणमुक्त करा
जिल्हाधिकारी राहुल रेखावार : २४ मार्चपर्यंत अर्ज करावेत
कोल्हापूर, ता. १६ : शेतकऱ्यांनी नकाशावर असणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी तसेच नकाशावर नसणारे अतिक्रमित, वहिवाटीचे रस्ते व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी ज्या-त्या तहसीलदार कार्यालयात शुक्रवार (ता. २४) पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
रेखावार म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात बागायती शेतीचा जिल्हा आहे. बागायती शेतीच्या अनुषंगाने यांत्रिक शेतीकडे वाढलेला कल व बदललेल्या मशागत पध्दतीमुळे शेतात जाण्यासाठी बारमाही रस्त्यांची नितांत गरज जाणवत आहे. जिल्ह्यात शेत रस्ते, वहिवाटीचे रस्ते, पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी लोकसहभागातून, शासकीय व प्रशासकीय पातळीवर काम सुरु आहे. तरीही अजून बरेच रस्ते अतिक्रमित किंवा बंद असल्याचे आढळून येत आहे. यासाठी गाव नकाशावर असणारे रस्ते अतिक्रमण मुक्त करणे त्याचप्रमाणे नकाशावर नसणारे अतिक्रमित व बंद रस्ते अतिक्रमण मुक्त करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे.