
संपातील कर्मचारी परतीच्या वाटेवर
जिल्हा परिषदेतून....
संपातील कर्मचारी परतीच्या वाटेवर
७०० कर्मचारी कर्तव्यावर; सोमवारी निर्णायक चित्र
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.१७ : जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी राज्यासह जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. मंगळवारी (ता.१४) संपाला सुरुवात झाली. मात्र, अनेक कर्मचारी संपात सहभागी होण्याबाबत साशंक आहेत. त्यातही शिक्षकांमध्ये मोठी चुळबूळ असल्याचे पाहायला मिळत आहे. संपातून अनेक शिक्षक कामावर परत येत असल्याचे चित्र आहे. मात्र, ही वस्तुस्थिती आहे की चुकीचे रिपोर्टिंग, याबाबत मात्र प्रशासन साशंक आहे.
कर्मचारी संपात सर्वाधिक मोठा सहभाग व संख्या आहे ती गट ‘क’ वर्गातील कर्मचाऱ्यांची. संपाच्या पहिल्या दिवशी गट ‘क’ मधील ३ हजार २४७ कर्मचारी कामावर उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी ही संख्या ३ हजार ३३ इतकी होती. तिसऱ्या दिवशी ३ हजार १३५ इतकी होती, तर चौथ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता.१७) हीच संख्या आता ३ हजार ८४२ झाली आहे. म्हणजे मागील चार दिवसांत कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. जी वाढ झाली आहे, त्यात शिक्षकांचा सर्वाधिक समावेश असल्याचे सांगण्यात येते.
संप मिटण्याची चिन्हे नसल्याने कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत. काही कर्मचारी संपातील कर्मचाऱ्यांना चकवा देऊन दुपारच्या सत्रात कामावर येताना दिसत आहेत. तसेच काहीजण अन्यत्र थांबून कार्यालयीन काम करत आहेत. कामावर रुजू होण्यावरून आता कर्मचाऱ्यांत किरकोळ वादविवादही होऊ लागले आहेत. काही कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून कामावर येण्याची तयारी केली आहे, तर कर्मचारी संघटनेने सोमवार (ता.२०) पासून हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात मंडप घालूनच पुढील आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची मात्र अडचण होणार आहे.
.................................