
२८३ दिव्यांगांना २० लाखाचा निधी
89679
----------------------------------------------------------
२८३ दिव्यांगांना २० लाखांचा निधी
गडहिंग्लज पालिका : यूडीआयडी कार्ड प्राप्त करून घेण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ : शहरातील २८३ दिव्यांग लाभार्थींना पालिकेच्या स्वउत्पन्नाच्या ५ टक्के राखीव निधीतून २० लाखांच्या निधीचे वितरण केले. दरम्यान, दिव्यांगांना बंधनकारक असलेले यूडीआयडी कार्ड (वैश्विक ओळखपत्र) तातडीने उपलब्ध करून घेण्याचे आवाहन केले.
सहायक प्रकल्पाधिकारी जयवंत वरपे यांनी दिव्यांग निधीची माहिती दिली. दिव्यांग टक्केवारीच्या प्रमाणात श्रेणी तयार केली आहे. त्यामध्ये ‘अ’ गटातील दिव्यांगांना प्रत्येकी ९ हजार, ‘ब’ गटातील दिव्यांगासाठी प्रत्येकी साडेसात हजार व ‘क’ गटातील व्यक्तींना प्रत्येकी साडेसहा हजार रुपयांचा निधी दिला जातो. दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी शासनाच्या आदेशाने पालिकेकडून ५ टक्के राखीव निधीतून ही आर्थिक मदत दिली जाते. २०२२-२३ या वर्षातील निधीचे वितरण केले. २८३ नोंदणीकृत दिव्यांग लाभार्थींना २० लाख २५ हजार ५०० रुपयांचा निधी त्यांच्या थेट बँक खात्यात जमा केल्याचे श्री. वरपे यांनी सांगितले. दिव्यांग व्यक्तीच्या समस्या या इतर सामान्य माणसाच्या समस्येपेक्षा वेगळ्या असतात. त्या समजून घेऊन नगरपालिका नेहमीच त्यांच्यासाठी सहकार्याची भावना ठेवेल, अशी ग्वाही दिली.
मिळकत विभागप्रमुख रविनंदन जाधव यांचे भाषण झाले. दिव्यांग संघटनेच्यावतीने मुख्याधिकारी स्वरूप खारगे, दिव्यांग कक्ष विभागप्रमुख जयवंत वरपे, समुदायक संघटक संदीपकुमार कुपटे यांचा सत्कार केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही वेळेत निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल दिव्यांग लाभार्थी संजय पवार व संभाजी गंधवाले यांनी सांगितले. कार्यालयीन अधीक्षक श्वेता सुर्वे, कर विभागप्रमुख भारती पाटील, महिला व बालकल्याण विभागप्रमुख अवंती पाटील, विद्युत अभियंता धनंजय चव्हाण, आस्थापना विभागप्रमुख ओंकार बजागे यांच्या हस्ते निधीचे वितरण केले. समुदायक संघटक संदीपकुमार कुपटे यांनी आभार मानले.