नॅचरल गॅसचा ग्राहकांना झटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नॅचरल गॅसचा ग्राहकांना झटका
नॅचरल गॅसचा ग्राहकांना झटका

नॅचरल गॅसचा ग्राहकांना झटका

sakal_logo
By

ich174,5.jpg
89744
इचलकरंजी : १) कामगार चाळीमध्ये पाईप लाईनद्वारे गॅसपुरवठा करण्यात येत आहे.
89745
२) वाढलेले गॅस बिल.

नॅचरल गॅसचा ग्राहकांना झटका
वाढीव बिलाने नागरिक हैराण; अनेकांकडून कनेक्शन बंद

संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १९ : नागरिकांना जीवनावश्यक बनलेल्या गॅस टाकीचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. त्यास नॅचरल (नैसर्गिक) गॅस हा मोठा पर्याय आहे. परिणामी, शासन विविध योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, येथे पाईप लाईनमधून सुरू असलेल्या नॅचरल गॅसचे बिल चार हजार रुपये आल्याने नागरिकांना चांगलाच झटका बसला आहे. अनेकांची बिले ही एलपीजी गॅस टाकीच्या तुलनेत अधिक येत आहेत. त्यामुळे या योजनेचे अनेक कनेक्शन बंद होत आहेत.
शहरात प्रथम कामगार चाळीमध्ये नॅचरल गॅसची पाईप लाईन सेवा सुरू केली होती. सुमारे २०० हून अधिक कनेक्शन आहेत. या ग्राहकांचे सुरुवातीचे काही महिने येणारे बिल एलपीजी गॅस टाकीच्या तुलनेत कमी आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत होते. मात्र, त्यानंतरची बिले १ हजार ५०० ते ४ हजार रुपये येण्यास सुरुवात झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाढीव बिलासंदर्भात संबंधित कार्यालयामध्ये तक्रार केली असता समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच गॅस कंपनीने खासगी संस्थेकडून बिल वसुली सुरू केल्याने ग्राहकांच्या संतापात भर पडली आहे. बिलांची दुरूस्ती न करता वसुली करीत असल्याचा आरोप करीत अनेकांनी कनेक्शन बंद केली आहेत. सध्या शहरात सुमारे ६९७ ग्राहक आहेत. मात्र, वाढीव बिले येत असल्याने शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेपासून नागरिक दूर जाताना दिसत आहेत.
--------
गॅस कनेक्शन बंद करण्यास १ हजार ७०० रुपये
घरगुती वापराच्या ‘नॅचरल गॅस’च्या (पीएनजी) वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) नळ जोडणी मोफत देण्याची योजना सुरू केली होती. तसेच, ग्राहकांना डिपॉझिटची रक्कम हप्त्याने मासिक बिलामधून भरण्याची मुभा दिली होती. मात्र, वाढीव बिलामुळे गॅस कनेक्शन बंद करण्यास गेल्यास १ हजार ७०० रुपये भरण्याची मागणी होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नवीन कनेक्शन घेण्याबाबत संभ्रम होत आहे.
-------
शासनाची नॅचरल गॅस योजना भविष्यासाठी आवश्यक आहे. मात्र, इचलकरंजी कार्यालयातील यंत्रणेत सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. वाढीव बिलाबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. कंपनीने केलेल्या दाव्या प्रमाणे बिले अपेक्षित आहेत.
- रवी रजपुते, माजी उपनगराध्यक्ष
-----------
ग्राहकांना मिळणारे गॅस बिल हे दोन महिन्यांचे असते. त्या सोबत कनेक्शन जोडणी वेळी जी स्कीम घेतली आहे. त्यानुसार बिल येत असते. तसेच वेळेत बिल न भरलेल्यांना दंड आकरण्यात येतो. त्यामुळे बिल अधिक आल्याचे दिसते. तरी ही ज्या ग्राहकांची बिल वाढीची तक्रार आहे. त्यांनी कार्यालयाशी भेटून चर्चा करावी. अनेक ग्राहकांना कंपनीच्या नियमानुसार बिले कमी करून देण्यात आली आहेत. कंपनीचा कारभार हा पारदर्शी आहे.
- सचिन सुतार, विभाग प्रमुख, गॅस बिल