पेठवडगाव
छत्रपती संभाजीनगर नामकरणावरून
पेटवडगाव, सावर्डे, मिणचेत तणाव
पोलिस ठाण्यांसमोर ठिय्या; हिंदुत्ववादी संघटनांची निषेध रॅली
पेठवडगाव, ता. १७ : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरणास विरोध करणारी क्लिप मोबाईलच्या स्टेटसला लावल्यावरून सावर्डे येथे तणाव झाला. हिंदुत्ववादी संघटनांनी याविरोधी आंदोलन केले. दोन तरुणांवर देशद्रोहाची कारवाई करावी, अशी मागणी करत पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. गावातून मोटारसायकल रॅली काढून निषेधाच्या घोषणा दिल्या. या घटनेमुळे सावर्डे, मिणचे, पेठवडगावमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवला होता.
सावर्डे (ता. हातकणंगले) येथील एका तरुणाने औरंगाबादच्या समर्थनाची क्लिप स्टेटसला ठेवली होती. यामधील संभाषणामुळे सावर्डे परिसरातील संतप्त तरुण गुरुवारी रात्री या तरुणाच्या घराकडे जाब विचारण्यासाठी गेले. संतप्त जमावाने या तरुणाच्या वडिलांना मारहाण केली. याशिवाय पोस्ट करणाऱ्या तरुणाबाबत विचारणा केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून तरुणाला ताब्यात घेतले. दरम्यान, त्याच्या घराच्या काच्चा, गाडी काही तरुणांनी फोडली.
ही घटना ताजी असताना त्याच पद्धतीने मिणचे (ता. हातकणंगले) येथील तरुणाने तोच स्टेटस ठेवला. याचे पडसाद आज उमटले. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले. मोटारसायकल रॅली काढली. ती रॅली सावर्डे भागात जाऊन वडगाव पोलिस ठाण्यासमोर आली. या वेळी पोलिस ठाण्याच्यासमोर त्यांनी ठिय्या मांडला. या दोन्ही तरुणांवर देशद्रोहाची कारवाई केल्याशिवाय उठणार नाही, अशी भूमिका घेतली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण यादव यांनी मध्यस्तीची भूमिका घेत समजावून सांगितले. परंतु, जमाव कारवाईच्या मागणीवर ठाम राहिला. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी काहीवेळ वाट पाहून पेठवडगाव शहरातून रॅली काढून निषेध व्यक्त केला. अखेर ॲड. दीपक पाटील यांनी मध्यस्थी करून जमावास शांत केले.
दरम्यान, या घटनेमुळे सावर्डे, मिणचेतील दुकाने भीतीने बंद झाली. याशिवाय पेठवडगाव शहरातील काही ठिकाणी दुकाने बंद झाली होती. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक रामेश्वर वैजणे, पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांच्यासह दंगल नियंत्रक पथक तैनात केले होते.
चौकट
मिणचे रोडवरील गोदाम पेटवले
सावर्डे येथील मिणचे रोडवर असलेल्या साखर पोत्यांच्या गोदामाला अज्ञातांनी मध्यरात्री आग लावण्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत गोदामामधील सुमारे आठ लाख किमतीची साखर पोती, बारदाण जळून खाक झाले. याशिवाय जवळचाा टेम्पो जळाला. यामध्ये दहा ते पंधरा लाखांचे त्यांचे नुकसान झाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.