
बचत गट उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उदघाटन
89690
कोल्हापूर : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्यातर्फे नवतेजस्विनी-महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटाच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार. शेजारी इतर मान्यवर. (नितीन जाधव ः सकाळ छायाचित्रसेवा)
89775
कोल्हापूर : प्रदर्शनात असलेली गवताची चटई.
महिलांनी आवश्यक प्रशिक्षण घेऊन सक्षम व्हावे
जिल्हाधिकारी राहुल रेखावार; दसरा चौकात बचत गटाच्या उत्पादनाचे प्रदर्शन सुरू
कोल्हापूर, ता. १७ : भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महिलांनी कलागुण ओळखून त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेऊन उद्योग व्यवसायातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्यातर्फे नव तेजस्विनी-महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटाच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन दसरा चौकात झाले. यावेळी ते बोलत होते.
बचत गटातील ज्येष्ठ महिला नवसाताई पाटील यांच्या हस्ते फीत कापून स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे, नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक आशुतोष जाधव, उमेद अभियानाच्या जिल्हा अभियान व्यवस्थापक वनिता डोंगरे, कोल्हापूर महापालिकेचे डेएलएलएमचे कार्यक्रम अधिकारी रोहित सोनुले उपस्थित होते.
प्रकल्प संचालक सुषमा देसाई म्हणाल्या, ‘‘सध्या मॉल आणि ऑनलाईन शॉपिंगद्वारे खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. यात टिकून राहण्यासाठी बचत गटांतील मालाचे दर्जेदार पद्धतीने ब्रँडिंग आणि पॅकेजिंग होणे आवश्यक आहे.’’ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे म्हणाले, ‘‘सेंद्रिय शेती उत्पादनाचे ब्रँडिंग, मार्केटिंग, रोपवाटिका निर्मिती अशा विविध उद्योगांना शासनातर्फे आर्थिक लाभ दिला जातो. वैयक्तिक लाभाबरोबरच बचत गटातील महिलांनी अधिकाधिक संख्येने एकत्र येऊन कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा.’’आशुतोष जाधव यांनी विमा सुरक्षा, डिजिटल पेमेंट, बचत गटांच्या माध्यमातून महिलांचा विकास आदीबाबत मार्गदर्शन केले. माविमचे सचिन कांबळे यांनी प्रास्ताविक केले. तंत्रज्ञान अधिकारी उमेश लिंगनूरकर यांनी आभार मानले. हे प्रदर्शन रविवार (ता. १९) पर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊ यावेळेत सर्वांसाठी खुले राहील.
----------------
चौकट
गवताची चटई लक्षवेधी
प्रदर्शनात इको-फ्रेंडली अशी हिवाळ्यात ऊब व उन्हाळ्यात गारवा देणारी गोल्डन ग्रासची चटई लक्ष वेधून घेत आहे. तसेच कोल्हापुरी मसाले, कोल्हापुरी चप्पल, विविध प्रकारचे तांदूळ, पापड, लोणचे, मातीची नक्षीदार भांडी, बांबूच्या विविध वस्तू, गारमेंट, तृणधान्यांपासूनचे विविध पदार्थ मांडण्यात आले आहेत.