
कोल्हापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला २२१ कोटी
कात्रण वापरणे...
फोटो- चंद्रकांत पाटील...
.......
शासकीय अभियांत्रिकी
कॉलेज कोल्हापूरला मंजूर
---
चंद्रकांत पाटील; २२१.४८ कोटींचा निधीही
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः कोल्हापुरात नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२३-२४) सुरू होणाऱ्या या महाविद्यालयाची प्रवेश क्षमता ३०० विद्यार्थी असणार आहे. त्यासाठी एकूण २२१ कोटी ४८ लाख रुपये इतक्या खर्चासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. याबाबतचा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासनाला सादर केला होता.
अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी टप्प्याटप्प्याने एकूण ६५ शिक्षकीय आणि ५० शिक्षकेतर अशी एकूण ११५ पदे मंजूर करण्यास मान्यता दिली आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री पाटील म्हणाले, ‘‘कोल्हापूर जिल्ह्यात ऑटोमोबाईल, ऑटोमेशन, टेलिकम्युनिकेशन, ऊर्जानिर्मिती आदी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला औद्योगिक विस्तार, तसेच सूतगिरणी, साखर कारखाने, कापड गिरणी, फौंड्री, मशिन शॉप आदींचा औद्योगिक विस्तारातील सहभाग लक्षात घेता जिल्ह्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची आवश्यकता होती.’’
हे अभ्यासक्रम शक्य
आर्टिफिशिअल इंटिलिजन्स अॅण्ड डाटा सायन्स
मेकॅनिकल अॅण्ड ऑटोमेशन इंजिनिअरिंग
कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग
इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
जूनपासून प्रारंभ, क्षमता ३००
कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनच्या जागेत नवे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी पूरक सुविधांची पाहणी शासकीय विभागीय समितीने ऑक्टोबर २०२२ मध्ये केली. याठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी सकारात्मक अहवाल राज्य शासनाला सादर केला. त्याला आज मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याने नव्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जूनपासून अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पहिले वर्ष सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविद्यालय सुरू करण्याबाबतच्या काही तांत्रिक बाबींच्या पूर्ततेची प्रक्रिया आता सुरू होईल. दरम्यान, महाविद्यालयाची सारी व्यवस्था पहिल्या टप्प्यात शासकीय तंत्रनिकेतनमध्ये असेल.