
रघुनाथदादा मोर्चा
89801
जुनी पेन्शनची मागणी मंजूर करू नये
सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे जिल्हाधिकारी रेखावार यांना निवेदन
कोल्हापूर, ता. १७ ः भरमसाट वेतन मिळते तरीही शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शनची मागणी करीत आहेत. दुसरीकडे सुशिक्षित तरुणांना रोजगार नाही, असे परस्पर विरोधी चित्र आहे. अशा स्थितीत जुनी पेन्शनची मागणी मान्य झाल्यास राज्याची अर्थिक स्थिती खालावेल म्हणून मागणी मंजूर करू नये, अशी मागणी सुशिक्षीत बेरोजगार तरुणांनी केली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना याबाबतचे निवेदन दिले.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे शासकीय कार्यालयातील कामे तसेच रुग्णालयातील उपचार सेवा ठप्प आहे. त्यामुळे जुन्या पेन्शनविरोधात मोर्चा काढण्यात येणार होता. त्यासाठी सुशिक्षित तरुण दसरा चौकात जमा झाले. मात्र, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. मोर्चाला नेतृत्वही कोणाचे नव्हते. यात ऐनवेळी शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी नेतृत्व केले.
ते म्हणाले, ‘देशाच्या एकूण महसुलापैकी ६५ टक्के निधी सरकारी नोकरदार व राजकीय नेत्यांवर खर्च होतो तर ९२ टक्के जनतेवर ३५ टक्के निधी खर्च होतो. सुशिक्षित तरुणांना किमान वेतनाच्या नोकऱ्या नाहीत, बेकारी वाढली आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही, असंघटित क्षेत्रातील लोकांचे हालच आहेत. यातून मानवी जगण्याचे प्रश्न गंभीर बनले आहेत. असे असताना लाखो रुपयांचे वेतन घेणारे कर्मचारी निवृत्तीनंतर पेन्शन मागत आहेत. याविरोधात बेरोजगार तरुणांच्या भावना सरकारने लक्षात घेणे अपेक्षित आहे.’’
डॉ. शंकर बावडेकर, डॉ. नामदेव निहुडकर, बाळ नाईक, रणजित भास्कर, पुंडलिक बिरांजे, तातोबा हंडे, गौरव लांडगे, अनिश पाटील, अभिषेक साने, शिवाजी कापसे, गणेश हजारे आदीच्या शिष्ठमंडळाने निवदेन दिले.