
धरणग्रस्त आंदोलन
आता लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चा
प्रकल्पग्रस्तांचा इशारा; १९ व्या दिवशीही आंदोलन सुरूच
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी आज १९ व्या दिवशीही आंदोलन सुरूच राहिले. ऊन, वारा, थंडीतही आंदोलन करणाऱ्या या प्रकल्पग्रस्तांना भेट देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे. आमदार, खासदार यांनी याकडे कानाडोळा केल्याने प्रकल्पग्रस्तांकडून नाराजी व्यक्त करत भेट न देणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशाराही या वेळी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाला आज डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल व सायबर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनकर्त्यांच्या महिला-पुरुषांच्या आरोग्याची तपासणी केली.
प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढा दिला जाईल. सरकारने वेळीच याबद्दल सकारात्मक निर्णय घ्यावा. प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा, अशी मागणी करत आज लोकप्रतिनिधींबद्दल नाराजी व्यक्त केली. १९ दिवसांत एकही लोकप्रतिनिधी, आमदार व खासदार आंदोलनस्थळी भेट द्यायला आले नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चा काढला जाईल. उद्या श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर पुन्हा आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. त्यांना मार्गदर्शन करून दिलासा देणार असल्याचे मारुती पाटील यांनी सांगितले. या वेळी डी. के. बोडके, रफिक पटेल, धोंडिबा पोवार, दगडू पाटील उपस्थित होते.