
डॉक्टरची ४९ लाखांची फसवणूक
डॉक्टरची ४९ लाखांची फसवणूक
---
जादा परताव्याचे आमिष; महिलेसह जळगावच्या एकावर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर रोज एक टक्का परतावा आणि तीन महिन्यांत ‘फिक्स डिपॉझिट’ दुप्पट करून देण्याच्या आमिषाने येथील एका डॉक्टरची तब्बल ४९ लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी स्वप्नजा पोवार (रा. सानेगुरुजी वसाहत) आणि अमोल कुलकर्णी (रा. जळगाव) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याचे जुना राजवाडा पोलिसांनी सांगितले. जून ते १७ मार्च २०२२ दरम्यान सानेगुरुजी वसाहत येथे फसवणूक झाल्याची फिर्याद डॉ. अभिजित नारायण जांभळे यांनी दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, की संशयितांनी डॉ. जांभळे आणि एका साक्षीदाराला आम्ही शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करतो, असे सांगितले. गुंतवलेल्या रकमेवर दररोज एक टक्क्याप्रमाणे परतावा देतो, तीन महिन्यांत ‘फिक्स डिपॉझिट’ची दुप्पट रक्कम देतो, असे सांगितले होते. त्यामुळे फिर्यादी डॉक्टर व साक्षीदार यांनी संशयित स्वप्नजा पोवार यांना भेटून वेळोवेळी गुंतवणूक केली. त्या रकमेवर संशयितांनी सुरुवातीस परतावा देऊन दोघांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे दोघांनी अधिक गुंतवणूक केल्यावर संशयित पोवारने त्यांना परतावा व मुद्दल देण्यासाठी टाळाटाळ केली.
डॉ. जांभळे यांनी पोवारकडे विचारणा केल्यावर त्यांनी संशयित अमोल कुलकर्णीची भेट घालून दिली. तेव्हा त्यांनी आपल्याला पैसे दिले आहेत. ते पैसे स्वतःची व इतर लोकांची देणी देण्यासाठी वापरले आहेत. कर्ज काढून पैसे भागवितो, असे सांगितले होते. यानंतर फिर्यादी डॉ. जांभळे व साक्षीदार यांनी पोवार आणि कुलकर्णी यांना वेळोवेळी भेटून पैशांची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पोवार आणि कुलकर्णी यांनी विश्वास संपादन करून संगनमत करून फसवणूक केल्याची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात येऊन फिर्यादी दिली. त्यानुसार पोलिसांनी पोवार आणि कुलकर्णी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक प्रीतमकुमार पुजारी तपास करीत आहेत.