
सीपीआर मधून रूग्णपळाला
मानिसक रुग्णाची
‘सीपीआर’मधून धूम
कोल्हापूर, ता. १६ : सीपीआर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मानसिक रुग्ण अचानकपणे पळून गेला. सुरक्षा रक्षक व व्हाईट आर्मीच्या जवानांनी रुग्णाला सुरक्षित पकडून पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय कर्मचारी संपात सहभागी असल्याने अपुरे मनुष्यबळ आहे. त्याचा सलग तिसरा फटका सीपीआरला बसल्याने वैद्यकीय अधिकारी हडबडून गेले.
सीपीआरच्या पुरुष वॉर्डात एका ३२ वर्षीय मानसिक रुग्णावर उपचार सुरू होते. या वॉर्डात परिचारिका व परिचर संपात सहभागी आहेत. त्यामुळे येथे मनुष्यबळ कमी होते. त्याच वेळी मोजक्या कर्मचाऱ्यांची नजर चुकवून रुग्ण बाहेर पडला. याची माहिती एका डॉक्टरांना मिळाली. त्यानंतर सुरक्षा रक्षक व व्हाईट आर्मीचे जवान दुचाकी घेऊन सीपीआर आवाराबाहेर रुग्णाला शोधू लागले तेव्हा रुग्ण दसरा चौकाच्या दिशेने पळत गेल्याचे दिसले. जवान व रक्षकांनी पाठलाग करून त्याला पकडले याचवेळी मानसोपचार विभागातील समुपदेशकांनी रुग्णाची समजूत काढत त्याला पुन्हा रुग्णालयात आणून दाखल केले.
या तरुणावर गेल्या काही महिन्यापासून मानसोपचार सुरू होते. तो बराही होत आला. मात्र त्याला घरचे लोक घेऊन जात नाहीत. त्यामुळे सध्या त्याला सिपीआरमध्ये ठेवले आहे. तो सध्या बोलतो, समजूनही घेतो. मात्र रुग्णालयात बसून कंटाळल्याने तो पळाला असल्याचा अंदाज आहे.