इंटिरियर डिझाईनसतर्फे प्रदर्शन

इंटिरियर डिझाईनसतर्फे प्रदर्शन

इंटिरियर डिझायनिंग उत्कृष्ट
साहित्य प्रदर्शन ७ एप्रिलपासून

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझाईनर्सतर्फे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझाईनर्स (आय.आय.आय.डी.) ही संस्था ५० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त संस्थेच्या कोल्हापूर विभागातर्फे ७ ते १० एप्रिलअखेर हॉटेल पॅव्हेलियनमध्ये इंटिरियर डिझायनिंगच्या उत्कृष्ट साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष चंदन मिरजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मिरजकर म्हणाले, ‘भारतातील अनेक नामवंत कंपन्या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. ख्यातनाम वास्तुविशारद दीपेन गाडा, हबीब खान, प्रताप जाधव तसेच सांगली, सातारा, कऱ्हाड, बेळगाव, गोवा, उत्तर कर्नाटक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी भागातून अनेक इंटिरियर डिझायनर उपस्थित राहणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्याने होतील. जे नागरिक आपल्या वास्तूचे इंटिरियर करत आहेत किंवा विचारात आहेत, त्यांच्यासाठी हे प्रदर्शन पर्वणीच ठरणार आहे. उत्तमोत्तम सजावट साहित्य एकाच छताखाली पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच इंटिरियर डिझायनिंगचे साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांनासुद्धा ही संधी असून, स्टॉल्सही उपलब्ध आहेत. याबरोबर आर्किटेक्ट सुनील पाटील, आर्किटेक्ट शिरीष बेरी यांचा विशेष सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.’
७ एप्रिलला दुपारी चार वाजता प्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल. यानंतर ८ ते १० एप्रिल या कालावधीत प्रदर्शन असेल. यानिमित्त १९ मार्चला सकाळी सात ते दहा वेळेत चित्रकला स्पर्धा भवानी मंडप येथे आयोजित केली आहे. तसेच २ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. रॅली छत्रपती ताराराणी चौक ते शहरातील मुख्य रस्तामार्गे हॉटेल पॅव्हेलियन या मार्गाने होईल.
पत्रकार परिषदेला सचिव गौरव काकडे, उपाध्यक्ष शरद पवार, खजिनदार किशोर पाटील, संचालक अभिजित चव्हाण, यशोराज मोहिते, सर्व पदाधिकारी उपस्थित होते. स्टॉलसाठी संस्थेच्या कोल्हापूर विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com