
चारा टंचाईने पशुपालकांची वाढवली चिंता
चारा टंचाईने पशुपालकांची वाढवली चिंता
कडब्याला आला सोन्याचा भाव; मका, गहू भुसा दर कडाडले
सदानंद पाटील, सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.१८ : उसाचा हंगाम संपल्याने ओला चारा म्हणून वापरात येणारे उसाचे वाडे आता बंद झाले आहे. तर वाड्याला पर्याय असणारे मका, नेपियर गवताची लागण देखील फारच कमी आहे. त्यामुळे या चाऱ्याचे दरही गगनाला भिडलेले आहेत. यावर्षी सर्वात कहर झाला आहे तो शाळूच्या कडब्याचा. या कबड्याला तर आता सोन्याचा दर आला आहे. बार्शी, पंढरपूर, सोलापूरसह कर्नाटकमधील विजापूर परिसरातून कडबा खरेदी केली जाते. चाऱ्याचे दर महागल्याने दुधाचा प्रती लिटर निर्मिती खर्चही खूपच वाढला आहे.
जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत दूध व्यवसायाला महत्वाचे स्थान आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून त्याकडे पाहिले जाते. मात्र दुधाच्या दरवाढीसह पशुखाद्याचे दरही वाढत चालले आहेत. चार,पाच महिने जिल्हयात उसाचे वाडे ओला चारा म्हणून उपलब्ध होते. मात्र मार्चच्या मध्यानंतर मात्र ओल्या चाऱ्याची टंचाई जाणवण्यास सुरुवात होते. तीच अवस्था सुक्या चाऱ्याची आहे. मार्च महिन्यात शेतकरी पशुपालकांचे डोळे ओल्या चाऱ्यासाठी मका, नेपियर गवत व तयार सायलेज याकडे लागलेले असतात. मात्र या चाऱ्याचे उत्पादन जिल्ह्यात फारच कमी आहे. व्यावसायिक पध्दतीने चारा उत्पादन होत नाही. जे काही उत्पादन होते, ते पशुपालक आपल्या जनावरांसाठी वापरतात. जिल्ह्यात मोठ्या गोठ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्या तुलनेत वैरण उत्पादन होत नसल्याने चारा टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.
पशुखाद्य, ओला चारा यासह पशुधनाला सुक्या चाऱ्याची गरज असते. चांगल्या प्रतीचे दूध मिळण्यासाठी सुका चारा महत्वाचा आहे. यातही शाळूच्या कडब्याला सर्वाधिक मागणी आहे. चांगले पोषणमूल्य असलेला कडबा हा सोलापूर, बार्शी, विजापूर या भागात मिळतो. त्या ठिकाणी पावसाने दडी मारली किंवा अवेळी आला तर त्याचा कडब्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. परिणामी चांगल्या कडब्याचे दर उच्चांकी पातळीवर जातात. आताही शाळूच्या कडब्याच्या पेंडीचा दर २० रुपयांपासून ४० रुपयापर्यंत गेला आहे. त्यामुळे पशुपालक आता कडब्याला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
....
वैरण (दर किलोमध्ये)
हरभरा धसकट ७ रुपये ५०
गहू भुस्सा १० रुपये
मका ७ रुपये
...
पशुखाद्य (सर्व दर किलोमध्ये)
पेंडीचे पोते १५०० रुपये (सरासरी ४० किलो)
हरभरा कळणा २८ रुपये
मका चुनी २४ रुपये
पेंड ३७ रुपये ५० पैसे
गहू भुस्सा २७ रुपये किलो
...
‘दुधाचे दर वाढले की, ग्राहकांकडून तक्रार केली जाते. मात्र चांगले पोषण मूल्य असलेल्या पशुखाद्याचे दरही दुधाच्या दरवाढीपेक्षा अधिक पटीने वाढत चालले आहेत. ओला आणि सुका चाराही महागला आहे. त्यामुळे दुधाच्या प्रती लिटर उत्पादनाचा खर्च वाढला आहे. दूध संघ तसेच पशुसंवर्धन विभाग, कृषी विद्यापीठ यांनी चाऱ्याचा हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
दत्ताजी पाटील, बेलवळे बुद्रुक, दूध उत्पादक शेतकरी