भालचंद्र कुलकर्णी निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भालचंद्र कुलकर्णी निधन
भालचंद्र कुलकर्णी निधन

भालचंद्र कुलकर्णी निधन

sakal_logo
By

89860
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः मराठी चित्रपटसृष्टीचा चालता बोलता इतिहास म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी (वय ८८) यांचे आज निधन झाले. सकाळी सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. कळंबा येथील निवासस्थानापासून दुपारी साडेबाराच्या सुमारास अंत्ययात्रा निघाली. त्यानंतर पंचगंगा स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (रविवार) सकाळी साडेआठ वाजता आहे.
कुलकर्णी यांचे मूळ गाव आळते (ता. हातकणंगले). त्यांचा २९ जुलै १९३५ रोजी जन्म झाला. शालेय जीवनापासूनच त्यांना नाटकाचे वेड. नाटकातील अभिनयाचे वेड जपतच पुढे ते शिक्षक झाले. त्यांनी येथील प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांत ३५ वर्षे सेवा दिली. ‘मी शिक्षक - मी विदूषक’ हा त्यांचा नाट्यप्रयोगही चांगलाच गाजला. मधू थिएटर्स या संस्थेच्या बॅनरखाली त्यांनी अनेक नाटकं साकारली. तीनशेहून अधिक चित्रपटांत विविध भूमिका साकारल्या. त्याशिवाय ‘दैवत’, ‘मर्दानी’, ‘सासर झालं माहेर’ या चित्रपटांसाठी त्यांनी कथा, पटकथा आणि संवादही लिहिले. सुमारे २५ नाटकांत भूमिका करून दिग्दर्शनही केले. त्यांनी ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’, ‘वादळवेल’, ‘हे व्यर्थ न हो बलिदान’, ‘मी शिक्षक - मी विदूषक’, ‘या प्रेमाची शपथ तुला’ ही नाटके लिहिली. प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, अनंत माने, कमलाकर तोरणे, विजय कोंडके यांच्यापासून ते महेश कोठारे यांसारख्या निर्माता-दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले. त्यांच्या चित्रपटातील कारकिर्दीला १९६५ मध्ये ‘शेरास सव्वाशेर’ या चित्रपटातून प्रारंभ झाला आणि अगदी अलीकडेच संजय तोडकर यांच्या ‘वहिवाट’ चित्रपटातील त्यांची भूमिका अखेरची ठरली. ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातूनही कार्यरत होते. महामंडळाच्या कार्यवाहपदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडली होती. एकूणच त्यांच्या मराठी चित्रपटातील योगदानाबद्दल चित्रपट महामंडळाने त्यांना ‘चित्रभूषण’ पुरस्कार देऊन गौरविले. त्याशिवाय अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला.
दरम्यान, पंचगंगा स्मशानभूमीत झालेल्या आदरांजली सभेत प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे प्रशांत कुलकर्णी, डी. बी. गंगातीरकर, ज्येष्ठ दिग्दर्शक भास्कर जाधव, शशिकांत जोशी, पंडित कंदले, नितीन कुलकर्णी आदींनी भावना व्यक्त केल्या. कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केली.

आदरांजली सभा उद्या
जयप्रभा स्टुडिओ व शालिनी सिनेटोन वाचविण्यासाठी झालेल्या आंदोलनात कुलकर्णी यांचा सक्रिय पुढाकार होता. चित्रपट महामंडळातील गैरकारभारावरही त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सोमवारी (ता. २०) प्रायव्हेट हायस्कूलमध्ये दुपारी चार वाजता आदरांजली सभा होणार आहे. सभेस सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चित्रपट महामंडळासह विविध कला संस्था, प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीने केले आहे.


गाजलेले अनेक चित्रपट ज्यांच्या अभिनयाने ओळखले गेले, असे ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. तीनशेहून अधिक चित्रपट करताना त्यांनी प्रत्येक भूमिकेत आपली वेगळी छाप सोडली होती. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.