शासकीय डॉक्टर  व्यवसाय

शासकीय डॉक्टर व्यवसाय

सीपीआरमधील ‘त्या’ डॉक्टराची खासगी प्रॅक्टीस!
दुहेरी भूमिका; १६ जणाविरोधात वैद्यकीय शिक्षण मंत्र्याकडे धाव
शिवाजी यादव : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : शासकीय रूग्णालयात नोकरी करणाऱ्या डॉक्टरांना खासगी प्रॅक्टीस करण्यास मान्यता नाही. असे असतानाही सीपीआर रूग्णालयातील १६ डॉक्टर खासगी प्रॅक्टीस करीत आहेत. एकाच वेळी शासकीय वेतन व खासगी सेवेतून पैसे कमवत आहेत. त्यामुळे शासकीय रूग्णालयातील रूग्ण सेवेकडे दुर्लक्ष होत आहे, अशा आशयाच्या तक्रारीचे निवेदन राज्याच्या वैद्यकीय शिक्षण सचिव व वैद्यकीय शिक्षण मंत्र्याकडे गोपनियस्तरावर रूग्णांकडून पाठवले आहे.
सीपीआर रूग्णालयातील डॉक्टर्सवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन व रूग्णांवर उपचाराची जबाबदारी आहे. सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत डॉक्टर्स रूग्ण तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया सेवा देऊन निघून जातात. सायंकाळी खासगी रूग्णालयात प्रॅक्टीस करतात. सीपीआरमध्ये दुपारनंतर प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स मर्यादीत उपचार सेवा देतात. त्यामुळे रूग्णांना दुसऱ्या दिवशी डॉक्टर येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते, त्यामुळे रूग्णांचे हाल होतात. या पार्श्‍वभूमीवर मंत्र्याकडे तक्रार झाली आहे.
शासनाकडून व्यवसाय रोध भत्ता न घेणाऱ्या शासकीय डॉक्टर्सना पूर्वी खासगी प्रॅक्टीस करण्याची मुभा होती. मात्र गेल्या दोन वर्षात नियमात बदल झाले, शासकीय डॉक्टर्सनी व्यवसायरोध भत्ता घ्यावा, पण खासगी प्रॅक्टीस करू नये, असे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले. तेव्हा सीपीआरमधील डॉक्टर्सनी खासगी प्रॅक्टीस करणार नाही, असे प्रशासनाला लेखी दिले होते. त्यातील काही डॉक्टर्सच खासगी प्रॅक्टीस करत आहेत. अशा डॉक्टर्सची नावे व खासगी रूग्णालयांची नावे त्या तक्रार निवेदनात स्पष्टपणे नमुद आहेत.
------------
असे डॉक्टर, अशी व्याप्ती
सीपीआरमधील चार प्राध्यापक, तीन विभाग प्रमुख, उर्वरीत सर्वसहयोगी प्राध्यापकांची नावे तक्रारीत आहेत. शाहूपुरी, राजारामपुरी, फुलेवाडी, शिवाजी पेठ, इचलकरंजी, लक्ष्मीपुरी, कळंबा रोड, साने गुरूजी वसाहत येथील खासगी रूग्णालयात सेवा देत असल्याचाही त्यात उल्लेख आहे.
------------
‘व्यवसायरोध भत्ता’ विषय लटकला
थोड्या फारफरकाने राज्यातील बहुतांशी शासकीय डॉक्टर्स खासगी प्रॅक्टीस करतात त्याच्या अनेकदा तक्रारी झाल्या. कॉँगेस, शिवसेना राष्ट्रवादी सरकारच्या काळात व्यवसायरोध भत्ता नाकारून खासगी प्रॅक्‍टीसला मान्यता देण्याची तयारी झाली. त्यानंतर सरकार बदलले तो विषय तिथेच थांबला. पुढे डॉक्टरांच्या संघटनांकडून अपेक्षीत पाठपुरावा झाला नाही. परिणामी शासकीय डॉक्टरांची खासगीतील प्रॅक्टीस हा विषय अधांतरी लटकला आहे.
---------------
तर खासगी प्रॅक्टीसमधून अधिक उत्पन्न
अशात डॉक्टरांवर कारवाई झाल्यास अनुभवी डॉक्टर शासकीय रूग्णालयातील सेवेतून मिळणाऱ्या वेतनापेक्षा खासगी प्रॅक्टीसमधून जास्त उत्पन्न मिळू शकते, याविचाराने हे डॉक्टर शासकीय नोकरी सोडून देतील. त्याचा शासकीय रूग्णालयातील उपचार सेवेवर विपरित परिणाम होण्याच्या शक्यतेने कारवाई थंडावल्याचे सुत्रांनी सांगितले.
--------------
कोट..
सरकारी रूग्णालयातील डॉक्टर खासगी प्रॅक्टीस करतात अशा तक्रारी होतात मात्र व्यवसायरोध भत्ता नाकारून शासकीय ड्युटी व्यतिरिक्तच्या वेळेत खासगी वैद्यकीय सेवा देण्याची संघटनेचीही मागणी आहे, त्यानुसार संघटनास्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
- डॉ. उदय मोहिते, राज्याध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com