
गुटखा विक्री दोघांना अटक
89916
-------
गुटखा तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
दोघेही चिक्कोडी तालुक्यातील ः पावणे चौदा लाखांचा गुटखा जप्त
कोल्हापूर, ता. १८ ः निपाणीतून पुण्याकडे जाणाऱ्या टेम्पोतून उजळाईवाडी येथे तब्बल १३ लाख ७२ हजार ८०० रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पो मालक आणि चालकाला अटक करण्यात आली. शाहरूख राजू मुल्ला (वय २२, रा. इंदिरानगर, यमगर्णी, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) आणि विजय नरसू कांबळे (२५, कांबळे गल्ली, नांगनूर, ता. हुक्केरी. जि. बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत.
महाराष्ट्रात गुटखा विक्री आणि उत्पादनास बंदी आहे. तरीही चिक्कोडी तालुक्यातील दोघांनी त्याची तस्करी करून महाराष्ट्रात गुटख्याची विक्री करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्यांना महामार्गावरच रात्री अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, महाराष्ट्रात गुटखा विक्री आणि उत्पादनासाठी बंदी आहे. तरीही गुटखा मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुटखा विक्री बंद झाली पाहिजे, यासाठी तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पथके तयार केली होती. पथकांकडून महामार्गावर गस्त सुरू असताना काल रात्री निपाणीहून पुण्याकडे जाणाऱ्या टेम्पोला अडवून अधिक चौकशी केली. तेव्हा टेम्पोत पान मसाला व सुगंधी तंबाखू असा सुमारे १३ लाख ७२ हजार ८०० रुपयांचा गुटखा आणि टेम्पो असा सुमारे २० लाख ४१ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल उजळाईवाडी येथे जप्त करण्यात आला. याची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली.