
जूनी पेन्शन संपामुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम
मिळकतींचे व्यवहार, बँकांची वसुली थंडावली
संपाचा परिणाम ‘मार्च एडिंगवर’
कोल्हापूर, ता. १८ ः जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याने सध्या शासकीय कार्यालयातील कामे थांबली आहेत. समाजातील सर्वच घटकांना याचा फटका बसला आहे. ऐन मार्च एंडींगच्या धामधुमीत बँकांनाही याचा फटका बसला आहे. दस्त करणे, वाहनांचे रजिस्ट्रेशन करणे अशी कामे थांबल्याने कर्जांचे हप्ते भरणे, कर्ज उचलणे थांबले आहे. याचा परिमाण बँकांच्या तिमाही लेखापरिक्षणावर होणार आहे.
मार्च महिन्याच्या शेवटी आर्थिक वर्ष संपते. याचवेळी बँकांचे लेखापरीक्षण होते. मार्चअखेर कर्जांची वसुलीही पूर्ण करावी लागते. मात्र गेल्या पाच दिवसांपासून शासकीय कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनसाठी संप सुरू आहे. यामध्ये जिल्हा मुद्रांक अधिकारी कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय यातील कर्मचारीही सहभागी आहेत. त्यामुळे जमिनी, सदनिका, घरे यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार थांबले आहेत. हे व्यवहार पूर्ण झाल्यावर जे कर्जदार राहिलेले हप्ते भरणार होते, त्यांचीही थकबाकी अद्याप तशीच राहीली आहे. जमिनीचे व्यवहारही थांबल्याने घर बांधणीसाठी घेतलेले कर्जही अद्याप उचलले गेलेले नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालय बंद असल्याने वाहनांची नोंदणीही थांबली आहे. वाहनांचे व्यवहारही थांबले आहे. याचा परिणाम बँकांच्या कामकाजावर झाला आहे. आर्थिक वर्षाखेर असल्याने कर्जाची वसुली करण्याचे आव्हान बँकासमोर असताना काही कर्जांचे हप्ते न भरले गेल्याने ही खाती थकीत असल्याचे नोंदवण्यात येईल. त्यामुळे बँकांचा एन.पी.ए वाढणार आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम बँकेच्या कामकाजावरही झाला आहे.