
मारहाण चौघांना अटक
तरुणास मारहाणप्रकरणी चौघांना अटक
कोल्हापूर, ता. १८ - महावीर उद्यान येथून दुचाकीवरून घरी येताना हॉर्न वाजवल्याच्या कारणातून तरुणास बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. हिना सोहेल सय्यद उर्फ हिमायल धनराज गाडेकर (वय २९ रा. सुभाषनगर), आरोही उर्फ अक्षय नागनाथ रसाळ (वय २६ रा. राजारामपुरी), जोया उर्फ रमेश गुरुसिद्धाप्पा दिन्नी (वय ३० रा. हुपरी रोड़, गडमुडशिंगी), नेहा उर्फ सचिन विपुल कस्तुरे (वय ३१ रा. सदरबाजार) अशी त्यांची नावे असल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले. गुन्हा नोंद झाल्यानंतर संबंधितांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी फिर्यादी दुचाकीवरून घरी जात होता. त्यावेळी गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या रागातून महावीर गार्डनसमोर थांबलेल्या पाच जणांनी त्याला थांबविले. तेथे बेदम मारहाण केली. त्यामुळे त्याला रक्ताची उलटी झाली. त्यानंतर सीपीआरमध्ये प्राथमिक उपचार घेतले.प्रकृती अधिक बिघडल्यामुळे त्याच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया केली. यानंतर मारहाणीची फिर्याद विष्णू पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली होती. यानुसार निरीक्षक गवळी यांनी गंभीर गुन्हा असल्यामुळे तातडीने याचा तपास करण्याच्या सूचना पोलिस उपनिरीक्षक सुनिता शेळके यांना दिल्या. त्यानुसार त्यांनी सिसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला असता, ही मारहाण हिना सय्यद व तिच्या साथीदारांनी केल्याचे दिसून आले. त्यामुळे आज या चौघांना अटक केली. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचे कलम लावण्यात आले. आज संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले.