शासकीय कर्मचारी संप बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय कर्मचारी संप बातमी
शासकीय कर्मचारी संप बातमी

शासकीय कर्मचारी संप बातमी

sakal_logo
By

89946
...

जुन्या पेन्शनच्या मागणीला
ठाकरे गटाचा पाठिंबा
---
जिल्हाप्रमुख संजय पवार यांची घोषणा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. या मागणीला आज शिवसेनेने (ठाकरे गट) आज पाठिंबा व्यक्त केला. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी टाऊन हॉल बागेत सुरू असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाला आपला पाठिंबा जाहीर केला.
जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी पाच दिवसांपासून शासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यात महसूल, आरोग्य, शिक्षण, जिल्हा परिषद या सर्वच विभागांतील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. टाऊन हॉल बागेत त्यांचे आंदोलन सुरू असून, या ठिकाणी सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शने केली. या वेळी त्यांनी टाळ, मृदुंगावर भजन म्हणून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, आज शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी टाऊन हॉल बागेत येऊन आपल्या पक्षाचा पाठिंबा जाहीर केला. शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी रास्त असल्याचे सांगून त्यांनी आपण त्यांच्याबरोबर असल्याचे जाहीर केले. या वेळी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते अनिल लवेकर यांच्यासह शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आज संपाचा पाचवा दिवस असल्याने सर्व शासकीय कार्यालये बंद होती. परिणामी, नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. जागांचे खरेदी-विक्री व्यवहार, शेतीची शासकीय दप्तरी असणारी कामे खोळंबल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी संपात सहभागी झाल्याने ग्रामीण भागात रुग्णांचे हाल होत आहेत. शासकीय रुग्णालयांचे कामकाज थांबल्याने नागरिकांना नाईलाजाने खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. जिल्ह्यातील बहुतांश शाळा बंद असून, विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे काय होणार, असा प्रश्न पालकांसमोर आहे. एकूण जुन्या पेन्शनच्या मागणीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
----------------

भाजप आमदाराचा निषेध
भाजपचे आमदार संजय गायकवाड यांनी सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे आमदार गायकवाड यांचा आंदोलनस्थळी निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांच्याविरोधात आंदोलकांनी घोषणा दिल्या.