
ich192.txt
ich191.jpg
89998
इचलकरंजी : श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने व्हीलचेअर प्रदान केल्या.
-------
स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे
आयजीएम रुग्णालयास व्हीलचेअर
नागरिकांतून समाधान; ‘सकाळ’च्या बातमीची दखल
इचलकरंजी, ता. १९ : आयजीएम रुग्णालयात व्हीलचेअर व स्ट्रेचर यांच्या अभावामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे ‘सकाळ’ने रविवारी (ता. १२) बातमी प्रसिद्ध करून लक्ष वेधले होते. त्याची दखल रुग्णालय प्रशासनासोबत सेवाभावी संस्थांनीही घेतली आहे. त्यानुसार नदीवेस नाका येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे आयजीएम रुग्णालयासाठी दोन व्हीलचेअर प्रदान केल्या. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
आयजीएम रुग्णालयात दररोज ६५० बाह्यरुग्ण, तर १५० आंतररुग्ण तपासणीसाठी येत असतात. रुग्णालय कॉर्पोरेट लूक घेत असल्याने रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्ट्रेचर व व्हीलचेअर उपलब्ध नसल्याने रुग्णांना व नातेवाइकांना त्रास सहन करावा लागत होता. यावर तत्काळ मार्ग निघावा व रुग्णांची कसरत कमी व्हावी, या हेतूने ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध केली होती.
या बातमीची दाखल घेत रुग्णालय प्रशासनाने बैठक घेऊन व्हीलचेअर व स्ट्रेचर खरेदीचा निर्णय घेतला आहे. ‘सकाळ’च्या बातमीने शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचेही लक्ष वेधले होते. केंद्राने गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या जन्मदिनाचे औचित्त साधून आयजीएम रुग्णालयास दोन व्हीलचेअर प्रदान केल्या. त्याचबरोबर रुग्णांना फळे वाटपही केले. डॉ. महेश महाडिक, डॉ. कुमार कदम, बाळासाहेब कलागते, नंदकुमार गोंधळी, सतीश पोतदार, गजानन हळदे, प्रकाश साठे, दिगंबर मंचेकर, प्रदीप कोळी, पवनसिंग रजपूत, दिलीप मजले, श्रीनिवास उरणे, राजेंद्र दळवी, रोहित मोळके आदी उपस्थित होते.