गवार, हिरवी मिरची तेजीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गवार, हिरवी मिरची तेजीत
गवार, हिरवी मिरची तेजीत

गवार, हिरवी मिरची तेजीत

sakal_logo
By

90004
गडहिंग्लज : गुढीपाडव्यासाठी साखरमाळांनी बाजारपेठ सजली असून त्याच्या खरेदीसाठी विचारपूस करताना ग्राहक. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)

गवार, हिरवी मिरची तेजीत
गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी गर्दी; द्राक्षांची आवक जास्त, नारळ, फुलांनाही मागणी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज ता. १९ : दोन दिवसावर आलेल्या गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी आठवडा बाजारात ग्राहकांची गर्दी होती. नारळ, फुले, साखरमाळा यांना अधिक मागणी होती. भाजी मंडईत गवार, हिरवी मिरचीची आवक कमी असल्याने दर तेजीत आहेत. कारली, बिन्स, दोडका यांचे भाव स्थिर आहेत. फळबाजारात सांगली जिल्ह्यातून द्राक्षांची आवक वाढली आहे. जनावरांच्या बाजारात वाढत्या उन्हाळ्यामुळे आवकेवर परिणाम झाला आहे.
साडे तीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा गुढीपाडवा बुधवारी (ता. २२) आहे. पाडव्याच्या पुजनासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी ग्रामीण भागातील ग्राहकांची आठवडा बाजारात गर्दी होती. साखरमाळा, नारळ, फुले यांची मागणी जास्त होती. विविध आकर्षक प्रकारच्या साखरमाळा २० ते ६० रुपयापर्यंत होत्या. नारळ २० ते २५ रुपये नग होते. शेवंती, झेंडूच्या फुलांचा किलोचा दर ७० ते ९० रुपयापर्यंत होता. मागणीमुळे सरासरी २० ते २५ टक्के दर वाढले होते. किराणा बाजारात गहू, हरभरा डाळीची मागणी आहे. भाजीमंडईत सर्वच फळभाज्यांचे दर वधारले आहेत.
दोडका, कारली, बिन्स, हिरवी मिरची यांचा दहा किलोचा दर ४०० रुपयांवर गेला आहे. गवारीचा दर कडाडला आहे. घाऊक बाजारात ८०, तर किळकोळ बाजारात १०० रुपये किलो असा गवारीचा दर आहे. मेथीच्या शंभर पेंढ्यांना ६००, तर एका पेंढीला दहा रुपये दर होता. उसाच्या लावणी, खोडव्यातील वांगी, टोमॅटोची आवक जास्त असल्याने दर पडलेलेच आहेत. वांगी १००, तर टोमॅटो १२० रुपये दहा किलो आहेत. फळबाजारात द्राक्षांचा हंगाम जोरात आहे. ४० ते ६० रुपये किलो दर आहे. सफरचंद १६० ते २००, माल्टा १००, पेरू, चिक्कू ७० रुपये किलो आहेत. जनावरांच्या बाजारात वाढत्या उन्हाळ्यामुळे म्हैशी, शेळ्या मेंढ्याची आवक कमी झाली आहे. सरासरी ३० टक्के आवक कमी झाल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. म्हैशींची सुमारे ६० तर शेळ्या मेंढ्याची ५० आवक नोंदली. म्हैशी २५ ते ८०, तर बकरी ५ ते १० हजार रुपये असा दर होता.
---------------
चौकट
शेवग्याची शेंग पाच रुपयाला
गेल्या दोन महिन्यापासून भाजीमंडईत शेवग्याच्या शेंगेची आवक जेमतेम आहे. मात्र, मागणी कायम असल्याने दर वाढत चालले आहेत. दहा रुपयाला चार शेंगेच्या पेंढीचा दर वीस रुपयावर पोहोचला आहे. त्यामुळे पाच रुपयाला एक शेवग्याची शेंग ग्राहकाला खरेदी करावी लागत होती.