
अंबाबाई मंदिर गर्दी
90021
शहर पर्यटकांनी बहरले
एकत्रित सुटीची संधी; श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः शनिवारी व रविवारी एकत्रित सुटीची संधी साधत करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी रविवारी दिवसभर भाविकांनी गर्दी केली. विशेषतः पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. अंबाबाईच्या दर्शनासोबतच शहरातील रंकाळा, न्यू पॅलेस व त्यानंतर जोतिबाचे दर्शन असा बेत भाविकांनी आखला. त्यामुळे दिवसभर या परिसरात भाविकांची गर्दी होती. भाविकांचे जथ्येच्या जथ्ये महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, चप्पल लाईन, छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिसत होते. भाविकांनी महाद्वार रोड व चप्पल लाईनला खरेदीचा आनंद लुटला. परगावांहून आलेल्या भाविकांनी दर्शनानंतर कोल्हापुरी जेवणावर ताव मारला. त्यामुळे दुपारी शहरातील हॉटेल्समध्येही गर्दी दिसत होती.
दरम्यान, अंबाबाई मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी मंडप, पिण्याचे पाणी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. उन्हाचा चटका बसत असला तरी अंबाबाईचे दर्शन घेण्यासोबतच शहरातील पर्यटनस्थळावर पर्यटकांनी गर्दी केली.