कृषीपंप धारकांकडे केवळ १२ दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषीपंप धारकांकडे केवळ १२ दिवस
कृषीपंप धारकांकडे केवळ १२ दिवस

कृषीपंप धारकांकडे केवळ १२ दिवस

sakal_logo
By

कृषी पंप धारकांकडे केवळ १२ दिवस
महाकृषी ऊर्जा अभियान; योजनेतून थकीत वीज बिलात ३० टक्के सवलत
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १९ : कृषी पंपाचे थकीत वीज बिल भरण्यासाठी प्रोत्साहन म्हणून महावितरणने महाकृषी ऊर्जा अभियान धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेतील यंदाच्या दुसऱ्या वर्षाचे ३० टक्के सवलत मिळवण्यासाठी कृषी पंप धारक शेतकऱ्यांकडे आता केवळ १२ दिवसच शिल्लक आहेत. थकीत वीजबिलाचा भरणा करून ही सवलत मिळवावी, असे अवाहन महावितरणने केले आहे.
सर्वत्र कृषी पंप वीज बिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. त्यातून गडहिंग्लज उपविभागही सुटलेला नाही. महावितरणकडून ही थकीत बिले वसुलीसाठी शेतकऱ्यांसाठी विविध सवलतीच्या योजना राबवल्या. काहींना प्रतिसाद मिळाला तर, काहींकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. गतवर्षीपासून कृषी पंपाच्या थकीत वीजबिलासाठी आणखीन एक योजना कार्यान्वित केली. या योजनेंतर्गत थकीत विज बिलामध्ये पहिल्या वर्षी ५०, दुसऱ्या वर्षी ३० व तिसऱ्या वर्षी २० टक्के सवलत मिळणार आहे. दुसऱ्या वर्षाची ३० टक्के सवलत ३१ मार्चला संपणार आहे. १ एप्रिलपासून शेवटच्या वर्षातील २० टक्केच सवलत मिळणार आहे.
वीज महावितरण कंपनीची गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यात मोठी थकबाकी आहे. सर्वाधिक बिल (१५ कोटी) चंदगड तालुक्यातील कृषी पंप धारकांची आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला योजनेचा प्रसार मोठ्या प्रमाणात केला. ठिकठिकाणी मेळावे घेऊन कृषी पंप धारकांना योजनेची माहिती दिली. पहिल्या वर्षी अनेक कृषी पंपधारकांनी योजनेचा लाभ घेऊन हजारो रुपयांची सवलत मिळविली आहे. आता दुसऱ्या वर्षाची सवलत संपण्यासाठी केवळ १२ दिवसच शिल्लक आहेत. तिन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांना ३० टक्के सवलतीचीच बिले दिली आहेत. ही रक्कम ३३ कोटीवर जाते. यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ थकीत बिल भरून या सवलतीची संधी प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणने वेगवेगळे पथक तयार करून गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यात वसुलीसाठी फिरत आहेत. टॉप थकबाकीदारांची यादी घेऊनच वसुलीची कार्यवाही केली जात आहे. योजनेची माहिती देऊन सवलत घेण्यास सांगितले जात आहे. थकबाकी वसुलीसाठी वेगवेगळ्या उपाययोजनेद्वारे अपेक्षित वसुली साध्य करण्यात महावितरणची धडपड सुरू आहे.

चौकट...
दृष्टिक्षेपात कृषी पंप बिल
आजरा : ३ कोटी ३३ लाख ६१ हजार
चंदगड : १५ कोटी ७६ लाख ५१ हजार
गडहिंग्लज : ७ कोटी ६८ लाख ८७ हजार
नेसरी : ६ कोटी ८७ लाख ४९ हजार
(सदरची रक्कम ३० टक्के सवलत वजा करून आहे.)