
शिवराज्याभिषेक
रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक
सोहळा जल्लोषात साजरा करणार
युवराज संभाजीराजे छत्रपती यांची माहिती
कोल्हापूर, ता. १९ : दुर्गराज रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी त्याबाबतची पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे.
महोत्सव समितीतर्फे रायगडावर दरवर्षी जल्लोषात सोहळा साजरा केला जातो. ५ व ६ जूनला वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा शिवराज्याभिषेकास ३५० वे वर्ष सुरू होत असून, २०२४ ला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे यंदा ६ जूनचा दिवस जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे, तर तत्पूर्वी ५ जूनला विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सोशल मीडियाद्वारे ३५० व्या शिवराज्याभिषेकाचे महत्त्व सांगणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत.
गडावर १९७४ ला ३०० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला होता. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९८०, राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनी १९८५, तर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९९ ला गडाला भेट दिली होती. त्यानंतर २०२१ ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गडाची पाहणी केली.
यंदा सुरू होणाऱ्या ३५० व्या सोहळ्यासाठी शिवभक्तांत उत्साह असून, गडावर लाखो शिवभक्त येण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, शासनाने शिवराज्याभिषेकासाठी ३५० कोटी रूपये जाहीर केले असून, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवराज्याभिषेक जल्लोषात साजरा करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.