
आयुक्तांसाठी साकारणार भव्य निवासस्थान
ich196.jpg
इचलकरंजी ः प्रांत कार्यालय परिसरात महापालिका आयुक्तांसाठी प्रशस्त असे निवासस्थान साकारणार आहे.
-----------
आयुक्तांसाठी साकारणार भव्य निवासस्थान
प्रांत कार्यालयानजिक १० गुंठे जागा निश्चीत ः मनपाकडून १ कोटी ७९ लाखाची ई- निविदा खुली
पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १९ ः येथील प्रांत कार्यालय परिसरात असलेल्या खुल्या जागेत महापालिका आयक्तांसाठी प्रशस्त असे निवासस्थान साकारणार आहे. १० गुंठे क्षेत्रात हे निवासस्थान उभारण्यात येणार असून याबाबतची ई-निविदा प्रशासनाकडून काढली आहे. १ कोटी ७९ लाख रुपये खर्चाची ही निविदा असून या कामाचा कालावधी एक वर्षाचा आहे. यामुळे आयुक्तांसाठी हक्काचे निवासस्थान तयार होणार आहे.
महापालिका आयुक्तांसाठी असलेल्या निवास्थानाच्या निकषाप्रमाणे आवश्यक सुविधा तेथे उपलब्ध नाहीत. त्यामुळे आयुक्तांसाठी स्वतंत्र निवासस्थान बांधण्याचा प्रस्ताव तयार केला. त्यासाठी प्रांत कार्यालयानजिक असलेली खुली जागा निश्चीत केली आहे. ही विस्तीर्ण जागा व्यापारी संकुलासाठी आरक्षीत आहे. त्याला धक्का न लावता आयुक्त निवासस्थानासाठी १० गुंठे जागा निश्चीत केली आहे. त्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रिया राबवली आहे. २ एप्रिलपर्यंत निविदा भरण्याची अंतिम मुदत आहे.
निविदा १ कोटी ७९ लाख ३१ हजार २५६ रुपये इतक्या खर्चाची आहे. तर हे काम पूर्ण करण्याचा कालावधी एक वर्षाचा आहे. बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून काही महत्वाचा अटी आणि शर्थी घातल्या आहेत. त्यामुळे हे काम मुदतीत पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा राहणार आहे. या कामासाठी महापालिका फंडातून खर्च केला जाणार आहे. त्यामुळे निविदा मंजूर झाल्यानंतर तातडीने कामास सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. निवासस्थानाच्या ठिकाणी अन्य महत्वाच्या सुविधांचा यामध्ये समावेश केला आहे. तेथे नियुक्तीसाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासाची सुविधा, रखवालदार कक्ष, वाहन तळ, छोटे कार्यालय अशा काही सुविधा तेथे साकारल्या जाणार आहेत. आयुक्त निवासस्थान आकारास आल्यानंतर या परिसराला वेगळे महत्व येणार आहे.
----------
२ कोटी १८ लाखांचे अंदाजपत्रक
आयुक्त निवासस्थानाच्या उभारणीसाठी १ कोटी ७९ लाखांची निविदा काढली आहे. प्रत्यक्षात २ कोटी १८ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. यामध्ये जीएसटीसह अन्य तत्सम खर्चांचा समावेश आहे.
----------
महापौर निवासस्थानसाठी जागेचा शोध
आयुक्त निवासस्थान बांधण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाली आहे. आता महापौर निवासस्थान उभारण्यासाठी प्रशासनाकडून जागेचा शोध सुरु केला आहे. तीन जागांची पाहणी केली आहे. जागा निश्चीत झाल्यानंतर नजिकच्या काळात महापौर निवासस्थान उभारण्याच्या कामाला गती येणार आहे.