
एकच मिशन जुनी पेन्शन
`त्या’ कर्मचाऱ्यांवर बहिष्कार टाकणार
शासकीय कर्मचारी संघटनेचा इशाराः
कोल्हापूर, ता. १९ : जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, यासाठी शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज सहाव्या दिवशीही संप सुरु ठेवला. राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मॅग्मो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी टाऊन हॉलमध्ये येवून बेमुदत संपास पाठींबा दिला.
राज्यभर सुरु असलेल्या बेमुदत संपामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १८ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. आज सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत संपकरी कर्मचारी व शिक्षकानी टाऊन हॉल येथे एकत्र आले. यावेळी अनिल लवेकर म्हणाले, ‘कार्यालयात हजेरी लावून बंदमध्ये सामील होणाऱ्या फुटीर अधिकाऱ्यांना संघटनेची ताकद दाखवली जाईल. जे कर्मचारी कामवर हजर राहतात, त्यांना गद्दार समजून संघटना त्यांच्यावर बहिष्कार टाकेल. त्यामुळे काहीजणांमुळे आणि काहींच्या दबावामुळे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.
संपात सामील न होणाऱ्या कर्मचारी, शिक्षक यांना धडा शिकविण्यासाठी असे कर्मचारी शिक्षक हे आपले मित्र, भाऊबंद असले तरी त्यांना धडा शिकविण्यासाठी त्यांच्यावर बहिष्कार टाकावा.’
राज्य सरकारी गट ड मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश भोसले म्हणाले, ‘कर्मचाऱ्यांना हक्काची पेन्शन मिळाली पाहिजे. वारंवार मागणी करुनही शासन याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे बेमुदत संपाचे हत्यार उपसावे लागले आहे. ’
दरम्यान, महाराष्र्ट राज्य अपंग कर्मचारी संघटना कोल्हापूर जिल्हा शाखा अध्यक्ष रावसाहेब शिंदे, राष्र्टवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर के पोवार यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावतीने बेमुदत संपाला पाठिंबा दिला. काल बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यानी शासकीय कर्मचाऱ्यांबाबत अपशब्द वापरले. चुकीच्या पध्दतीने आरोप केल्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात आला.