
मुश्रीफ ईडीत
मुश्रीफ आज पुन्हा ‘ईडी’ त जाणार
जबाबासाठी बोलवले ः दुसऱ्यांदा ‘ईडी’ चे बोलवणे
कोल्हापूर, ता. १९ ः गेल्या आठवड्यात सक्तवसुली संचालनालयात (ईडी) गेलेले राष्ट्रवादीचे नेते व आमदार हसन मुश्रीफ उद्या (ता. २०) पुन्हा ईडी कार्यालयात जाणार आहेत. ईडीनेच त्यांना सोमवारी पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवले आहे.
जिल्हा बँकेतून सरसेनापती संताजी घोरपडे व ब्रिक्स कंपनीला दिलेल्या कर्ज प्रकरणावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी श्री. मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. त्या अनुषंगाने ईडीने दोनवेळा जिल्हा बँकेसह श्री. मुश्रीफ यांचे निवासस्थान व नातवाईकांच्या घरावर छापा टाकला होता. गेल्या आठवड्यात झालेल्या छाप्यावेळी ईडीने श्री. मुश्रीफ यांना समन्स बजावून मुंबईतील कार्यालयात हजर रहाण्याची सूचना दिली होती.
‘ईडी’ च्या या कारवाईला श्री. मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर निकाल देताना उच्च न्यायालयाने श्री. मुश्रीफ यांच्यावर २० मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले होते. त्याच दिवशी श्री. मुश्रीफ यांनी ईडी कार्यालयात जाऊन आपला जबाब नोंदवला. पण त्यांना उद्या (ता. २०) पुन्हा एकदा ईडीने कार्यालयात बोलवले आहे. त्यासाठी श्री. मुश्रीफ आजच मुंबईला रवाना झाले.
............