
चिवा काटी
90123
कोल्हापूर : गुढीपाडवा दोन दिवसांवर असला, तरी चिव्याची काठी विक्री शहर, उपनगरात अनेक ठिकाणी सुरू आहे.
चिव्याच्या काठीची विक्री
शहर परिसरात सुरू
गुढीपाडव्याचा सण बुधवारी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ : गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षारंभ. हा गुढीपाडव्याचा सण बुधवारी (ता. २२) आहे. गुढीसाठी लागणारी चिवा काठी (मेस काठी) शहरासह उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. एक चिवा काठी १५० ते २०० रुपयांना एक आहे.
गुढीपाडव्याला नैवेद्यासाठी जशी गूळपोळी असते, त्याप्रमाणे गुढीसाठी चिवा काठीचे अपार महत्त्व आहे. चिवा काठी आजरा, चंदगड, गडहिंग्लज, गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांतून, जिल्ह्यातील पश्चिम भागातून विक्रीसाठी इथे आणली जाते. गुढीच्या आधी चार ते पाच दिवस ही चिवा काठी तोडून, साफ करून ट्रॅक्टर, बैलगाडी, ट्रकमधून शहरात आणली जाते. शेतकऱ्यांकडून नाममात्र दरात ती विकत घेतली जाते.
पश्चिम भागातील नदीकाठ, ओढ्याच्या काठी चिवा काठीचे उत्पादन होते. पश्चिम भागात पाऊस अतोनात असतो. यासाठी नदीकाठी, ओढ्याकाठी चिवा लावण्याचे कारण म्हणजे पावसाबरोबर येणाऱ्या पाण्याबरोबर चिखलमाती साचून राहावी, शेतीचा बांध घसरू नये, नदीकाठची जमीन तुटून जाऊ नये, यासाठी शेतकरी चिव्याची लागवड करतात. तसेच माळरान, जंगलातील चिव्यांना वणवा लागू नये, यासाठी दक्षता घेतली जाते. चिव्यासाठी विशेष अशी व्यवस्था करावी लागत नाही. जूनमध्ये चिव्याचे रोप लावले, की पालापाचोळा, जनावरांचे शेण आदी टाकले तरी तो तरारून येतो. रासायनिक खते घालण्याची गरज लागत नाही. सहजपणे नैसर्गिक पद्धतीने चिव्याचे उत्पादन येते. गुढीपाडव्याशिवाय चिव्याच्या काठीपासून अनेक वस्तू तयार केल्या जातात. टोपले, डालगे, बुट्टी आदी वस्तू तयार होतात. चिव्यापासून अनेकांना रोजगार मिळाला आहे.
कोट
सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस आम्ही चिवा काठीची विक्री करतो. बुधवारी (ता. २२) गुढीपाडवा असल्याने मंगळवारी (ता. २१) सायंकाळपर्यंत अधिक विक्री होईल. काही झाले तरी चिवा काठी घेतली जातेच. ती वाया जात नाही.
- सुमीत सूर्यवंशी, चिवा काठी विक्रेते