
गुन्हेगारी वृत्त
उचगावमध्ये कौटुंबिक वादातून मारहाण
कोल्हापूर ः उचगाव (ता. करवीर) येथील मणेर मळ्यातील साईनाथ कॉलनीमध्ये दोन कुटुंबांमध्ये झालेल्या वादातून चौघांना मारहाण झाली. रविवारी (ता.१९) मारामारीचा प्रकार घडला. विजय रमेश पाटील (वय २१) आणि दिव्या विजय पाटील (वय १९, दोघेही रा. साईनाथ कॉलनी, मणेर मळा) या पती-पत्नीच्या वादातून दिव्या हिच्या माहेरचे नातेवाईक आणि सासरचे नातेवाईक आमने-सामने भिडले. यात विजय पाटील यांच्यासह त्यांचा लहान भाऊ यशोदीप रमेश पाटील (वय १९) हा जखमी झाला, तर पाटील कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीत दिव्या आणि तिचा भाऊ जगदीश सचिन यादव (वय १८, रा. साईनाथ कॉलनी, मणेर मळा) हे दोघे जखमी झाले. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
............
आत्महत्येच्या प्रयत्नातील महिलेस रोखले
कोल्हापूर ः कौटुंबिक वादातून निराश होऊन पंचगंगा नदी घाटावर आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या महिलेला घाटावरील नागरिकांनी रोखले. ही घटना रविवारी (ता. १९) दुपारी एकच्या दरम्यान घडली. नागरिकांनी तिची समजूत घालून तिला लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. सीपीआरमध्ये प्रथमोपचार केल्यानंतर पोलिसांनी तिचे समुपदेशन केले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.