माय स्कूल, किडस स्कूल ॲडमिशन पुरवणी लेख

माय स्कूल, किडस स्कूल ॲडमिशन पुरवणी लेख

‘कौशल्य’वान विद्यार्थी
घडविणाऱ्या शाळा


आज शिक्षणपद्धती आणि शिक्षण देणारी साधने बदलली आहेत. भारतीय, विदेशी शिक्षण पद्धतीचे शिक्षण देणाऱ्या संस्थांची निर्मिती झाली आहे. खासगी तसेच सरकारी शाळातूनही वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून जसे डिजिटल शाळा, ऑडिओ-व्हिडिओ, ऑनलाइन क्लासेस आदींच्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या अनेक शाळा येत आहेत. नवनवीन तंत्रज्ञान घेऊन आलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंअध्ययनाची सवय लावणे सोपे झाले आहे. ज्या बाबी अनेक तंत्रज्ञान वापरून खासगी किंवा इंग्लिश मीडियम शाळांमध्ये शिक्षण दिले जात आहे. असे तंत्रज्ञान सरकारी शाळातूनही वापरण्याची गरज आहे.
--------------------

अनेक खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा स्वतःची अध्ययन, अध्यापनाची पद्धत विकसित करताना दिसून येत आहेत. भारताचे सुजाण नागरिक घडवण्यासाठी अनेक खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा गुरुकुल पद्धतीने सैनिकी शिक्षणही देत आहेत. केजी किंवा प्रायमरीसाठी ॲडमिशन घेताना पालक शाळांतील सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक ज्ञानासाठीची साधने यांचा विचार करूनच मुलांचा प्रवेश निश्चित करतात. लहान मूल म्हणजे चिखलाचा गोळा. त्याला आकार देणे शिक्षकांचे काम असते. पण बालमानसशास्त्राच्या आधारे प्रत्येक बालकात कोणती ना कोणती क्षमता किंवा कौशल्य दडलेले असते. ही क्षमता विकसित करण्यासाठी शाळांमधून रचनात्मक खेळांची योजना असते. उदा. ठोकळे जुळवणे, अंक जुळवणे, चित्रांची व्यवस्थित मांडणी करण्याचे कौशल्य त्याने विकसित करणे. यामुळे त्यांचे सहशिक्षणही होते. क्षमताही विकसित होत जाते. हेच तंत्र आज-काल काही खासगी शाळांमधून वापरण्यात येत आहे.
पूर्वी एकत्रकुटुंब पद्धती होती. त्यावेळी घरातील ज्येष्ठ मंडळी, आजी-आजोबा, काका-काकी या मुलांना काही ना काही गोष्टी सांगून किंवा बाहेर नेऊन अनेक अनुभव देत होते. ज्ञानेंद्रियाद्वारे त्याचा मेंदू विकसित करण्याचे काम सहजतेने करत होते. तशाच पद्धती अनेक खासगी शाळांमध्ये वापरत असल्याचे दिसून येते. आज मुलांना एकदम इंग्रजी, गणित सारख्या विषयांची ज्ञान दिले जाते. पण असे न करता पूर्वीच्या काळाप्रमाणे वनस्पती, फळे, फुले अनेक प्रकारच्या कथा, पुराण कथा, ऐतिहासिक कथा या त्याला चित्राच्या माध्यमातून देऊन त्याचे मन, मनगट व मेंदू विकसित करण्याचे काम करण्याची आवश्यकता आहे.

आजच्या मुलांत सर्वात मोठी समस्या म्हणजे मुले शाळेला गेल्यानंतर जे पदार्थ खायला नकोत. ज्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो असेच पदार्थ सर्रास खाताना ते दिसतात. त्यामुळे त्यांना घरातून डबा देताना चपाती किंवा भाकरी आणि हिरव्या भाज्या, कडधान्यांचा समावेश असलेल्या पदार्थांचा डबा शाळेमध्ये बंधनकारक असावा. शाळेतूनही तसेच जेवण किंवा भाजी मिळाले तर जीवनसत्वे किंवा त्याची आवड जर त्याला लहानपणापासूनच लागली तर तो भविष्यात चांगलेच खाद्यपदार्थ खाण्याचा प्रयत्न करेल. हे लक्षात घेऊनच खासगी, सरकारी शाळांतूनही पोषण आहार मिळतो.
नवीन शाळा निवडताना त्या शाळेला प्रत्यक्षात क्रीडांगण आहे का, क्रीडाशिक्षक आहेत का, जिम्नॅस्टिक किंवा इतर त्याच्या अवयवांना व्यायाम देणारे खेळ घेतले जातात का? याबद्दलची चौकशी करणे आवश्यक आहे. लहानपणापासूनच मुलांना बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकास, सामान्यज्ञान तसेच समाजातील शिष्टाचार शिकवणे अत्यावश्यक आहे. खासगी शाळा आणि काही सरकारी शाळातूनही खेळाडू किंवा सैनिक यांच्या प्रत्यक्ष मुलाखती किंवा मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. पूर्वी ऋषींच्या कुटीमध्ये राहून शिक्षण घेताना वेदांचे पठण केले जात होते. संस्कृत भाषेतील पाठांतराची सवय लावली तर वाचन, वाणी शुद्ध होऊ शकते आणि अशी शिक्षणव्यवस्था आवश्यक आहे.
अगदी साध्या बाबीपासून किती चांगल्या ज्ञानक्षमता विकसित करू शकतो हे मुलांना सांगणे, शिकवणे, प्रशिक्षण देणे आवश्यक असते. कारण आजकालच्या मुलांना हे वाटत आहे की आपण मनात जे आणेल ते खरेदी करू शकतो. चुटकी सरशी ते आपल्याला प्राप्त होऊ शकते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या एकदा वापरलेल्या अनेक गोष्टी फेकून देणे किंवा त्याचा पुनर्वापर न करणे याकडे लहानपणापासूनच त्याची सुरुवात होते आणि ही मोठी समस्या निर्माण होईल. हे लक्षात घेऊन काही ठिकाणी पुनर्वापराबाबतचे प्रशिक्षण दिले जाते.

आजकालची मुले हट्टी असतात. त्यांनी एखादी गोष्ट मागितली की पालकांचा त्याची मागणी पूर्ण करण्याकडे कल असतो. पण मूल जसे मोठे होऊ लागते तसतसे मागण्याही वाढतात. पालक त्या मागण्या पूर्ण करू शकत नाही किंवा त्याच्या मागण्या चुकीच्या आहेत हे पालकांना कळू लागते आणि त्यामुळे मुले नाराज होतात व अशी मुले टोकाचा निर्णय घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात, असे दिसून आले आहे. या बाबी लक्षात घेऊनच अनेक खासगी शाळांतून पालकांबरोबर वेळोवेळी संपर्क, मुलांच्या गरजा, त्या भागविण्याचे मार्ग याकडे विशेष लक्ष दिले जाते. त्या वस्तूंची गरज नसेल तर नेमके काय परिणाम होतात हे समजावून सांगण्यासाठी विशेष वर्गही घेतले जातात. त्यामुळे लहानपणापासून एखादी गोष्ट सहन करणे, दुःख सहन करणे, दुःख व्यक्त करण्याची पद्धत, पर्यायी मार्ग शोधण्याची पद्धत या बाबींचे प्रशिक्षण त्याला खासगी शाळांमधून दिली जात असल्याचे दिसून येत आहे.
-------

चौकट
सुटीचा सदुपयोग करा असा...
एखाद्या वर्गाची परीक्षा संपल्यानंतर लगेच पुढील वर्गाच्या अनेक विषयांच्या तासिकांना सुरुवात होते. मुलांना सुटीमध्ये नेमके त्यांनी काय करावे याचे प्रशिक्षण दिले जात नाही. परीक्षा झाल्यानंतर एप्रिल, मे आणि जूनच्या कालावधीत त्यांना शालेय पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहार ज्ञानातील काही कौशल्य प्राप्त करून देण्याची आवश्यकता आहे. उदा. हस्ताक्षर, चित्र, गायन, वादन, नृत्य, शेतीमध्ये काम करणे, विविध खेळ, श्रवण, वाचन, भाषण, संभाषण इत्यादी कौशल्ये विकसित करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करणे अत्यावश्यक आहे. यालाच फुरसतीच्या वेळेतील प्रशिक्षण किंवा सुटीतील संस्कार वर्ग असे म्हणतो. आज अनेक खासगी शाळा तसेच काही सरकारी प्राथमिक शाळांतूनही असे वर्ग चालवले जातात.

- एकनाथ निवृत्ती चौगले,
शिक्षक आणि समुपदेशक, बहिरेश्वर.
.........................................................................................................
नवीन शाळेत प्रवेश घेताना...
- शाळेत उपलब्ध भौतिक सुविधा
- दर्जेदार शिक्षण
- वर्गातील नियमानुसार पटसंख्या
- क्लासवर्क, होमवर्क देणे, नियमित तपासणी करणे
- विद्यार्थी प्रगतीबाबत वेळोवेळी चर्चा करणे
- सुसंस्कारासाठी कोणते उपक्रम राबवले जातात
- सहशालेय उपक्रम वर्षभरात घेतले जातात का?
-अध्ययन, अध्यापनात नवीन तंत्रज्ञान, डिजिटल क्लासरुम आहेत का?
- आनंददायी शिक्षणाच्या दृष्टीने वातावरण आहे काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com