महापालिकेच्या खुल्या जागांची आबाळ

महापालिकेच्या खुल्या जागांची आबाळ

89350
कोल्हापूर : प्रतिभानगर येथील खुल्या जागेवर उद्यानाची उभारणी करण्यात आली. मात्र, देखभाल दुरुस्तीअभावी या उद्यानाची अशी दुरवस्था झाली आहे.

महापालिकेच्या खुल्या जागांची आबाळ
ओपन जिम, उद्यानांची दुरवस्था; देखभाल दुरुस्तीच्या खर्चाची तरतूदच नाही
ओंकार धर्माधिकारी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० : महापालिकेच्या खुल्या जागांवर तेथील नागरिकांनी किंवा नगरसेवकांनी विविध प्रकारचे प्रकल्प उभारले आहेत. यामध्ये उद्याने, ओपन जिम, वृक्षलागवड केली जाते. काही ठिकाणी लोकांना सुविधा देण्यासाठी काही इमारती, सभागृह उभारली जातात. मात्र, त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चाची तरतूद महापालिकेकडे नाही. त्यामुळे काही वर्षांनंतर याची दुरवस्था होते. नागरिकांना या सुविधांचा लाभही घेता येत नाही.
शहरात विविध ठिकाणी महापालिकेच्या सुमारे ३० ते ३५ खुल्या जागा आहेत. या जागांवर कचरा टाकला जायचा. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरायची. काही ठिकाणी मोठी वाहने अनधिकृतपणे येथे उभी केली जायची. या सर्वांचा त्रास थांबावा आणि या खुल्या जागांचा नागरिकांना सुविधा देण्यासाठी उपयोग व्हावा, यासाठी या जागांवर विविध प्रकल्प उभारले गेले. आमदार फंडाचाही उपयोग झाला. तर काही खुल्या जागांचा विकासहा शासकीय योजनांमधून झाला. काही खुल्या जागांवर नागरिकांनी वर्गणी काढून प्रकल्प उभारले. यातून छोटी, पण चांगली उद्याने, ओपन जिम, वॉकिंग ट्रॅक तयार झाले. वृक्षारोपण करून परिसर हिरवागार झाला. लहान मुलांना बागडण्याच्या, वृद्धांसाठी निवांतपणाच्या जागा तयार झाल्या. सकाळी आणि संध्याकाळी या परिसरात नागरिक येऊ लागले. पूर्वी त्रासदायक ठरणारी ही ठिकाणे त्यांच्यासाठी आनंदाच्या जागा झाल्या. ज्या कंत्राटदाराने हे प्रकल्प उभारले. त्यांनी काही वर्षे याची देखभाल दुरुस्ती केली. मात्र, नंतर देखरेखीअभावी या प्रकल्पांची आबाळ झाली. उद्याने भकास बनली. येथील खेळणी चोरीला गेली. उद्यानात रात्री मद्यपी आणि गर्दुल्ले यांचा धुडगूस सुरू झाला. त्यामुळे आता या जागा पुन्हा नागरिकांना त्रासदायक ठरू लागल्या आहेत. महापालिकेत या जागांच्या देखभालीसाठी स्वतंत्र निधी नाही. कर्मचारी मुळातच कमी आहेत. अशात या जागांच्या देखभालीसाठी कोठून कर्मचारी देणार, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे.
------------------
चौकट
प्रतिभानगर उद्यानाची दुरवस्था
प्रतिभानगर येथील उद्यान माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या फंडातून करण्यात आले. मात्र, सध्या सुरक्षारक्षक नसल्याने हे उद्यान बंद ठेवले आहे. उद्यानाची दुरवस्थाही झाली आहे. नागरिकांनी वर्गणी काढून येथे बोअरिंग मारले. कुंपण आणि गेट करून घेतले; पण सध्या हे उद्यान बंद आहे.
-----------------------
उद्यान, पौडी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी या खुल्या जागांवरील प्रकल्पांची देखभाल करतात. मात्र, त्यांच्या मूळ विभागातील काम झाल्यावर त्यांना हे काम करण्यासाठी पाठवण्यात येते. निधी आणि कर्मचारी यांच्याअभावी या खुल्या जागांवरील प्रकल्पांची देखभाल वेळच्या वेळी करणे कठीण होते.
- समीर व्याघ्रांबरे, पर्यावरण अधिकारी, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com