कृषी महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी महोत्सव
कृषी महोत्सव

कृषी महोत्सव

sakal_logo
By

राशिवडेत होणार जिल्हा कृषी महोत्सव

जिल्हाधिकारी : २६ ते ३० मार्चदरम्यान होणार महोत्सव


कोल्हापूर, ता. १३ : ‘जिल्ह्यात कृषी मालाचे योग्य उत्पादन मिळावे, शेतीतील नवनवीन तंत्रज्ञ शेतकऱ्यांपर्यंत पोचावे, शेती औजारे, हरितगृह, बायोटेक्नॉलजी, फलोत्पादन, रेशीम उद्योग या सर्वांची माहिती एकच ठिकाणी आणि एकाच छताखाली मिळावी, यासाठी राशिवडे बुद्रुक (ता. राधानगरी) येथे जिल्हा कृषी महोत्सव घेतला जाणार आहे. रविवार (ता. २६) ते गुरुवार (ता. ३०) दरम्यान होणाऱ्या या कृषी महोत्सवाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भेट द्यावी’, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘कृषिविषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना झाली पाहिजे. शेतकरी-शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार यांची साखळी सक्षमीकरण, समूह गट संघटित करुन शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी केली जाईल. विक्रेता खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास आणि विपणनास चालना दिली जाणार आहे. दरम्यान, शहरात निर्माण होणाऱ्या विविध कृषी औजारांची ग्रामीण भागात माहिती झाली पाहिजे.यासाठी यापूर्वी इचलकरंजी येथे आणि आता राशिवडे येथे कृषी महोत्सव घेतला जात आहे. जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील डोंगरी भाग असलेल्या भुदरगड, राधानगरी, आजरा या तालुक्यामध्ये शेतीची कमी उत्पादकता असल्याचे दिसून येत आहे. याच कारणामुळे हा महोत्सव घेतला जात आहे. दुर्गम, डोंगराळ आणि विकासापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ झाला पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे.’
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालंदर पांगारे म्हणाले, ‘यंदाच्या कृषी महोत्सवात ऊस उत्पादकता वाढीबाबत माहिती दिली जाईल. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त ‘मुठ्ठी भर मिलेट, हर घर मिलेट, हर मुठ्ठी मिलेट’ असा पौष्टिक तृणधान्यांचा प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे. महोत्सवात शासकीय ४०, कृषी निविष्ठा स्टॅाल ३०, सिंचन सुविधा आणि तंत्रज्ञान स्टॉल ३० असे २०० हून अधिक स्टॉल असणार आहेत. ’
.....

सरपंच आणि सहकार परिषदही होणार

‘शासनाच्या कृषीविषयक सर्व योजनांची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे. कृषी महोत्सवात तसे नियोजन करावे’, अशा सूचनाही श्री रेखावार यांनी दिल्या आहेत. याच ठिकाणी सरपंच, सहकार व महिल परिषद घेतली जाईल. याचेही नियोजन केले जात आहे. यासाठी सर्व सरपंचांना पत्र पाठविले जाणार असल्याचे श्री. रेखावार यांनी सांगितले.