सजग पालक सशक्त शिक्षण...

सजग पालक सशक्त शिक्षण...

सजग पालक
सशक्त शिक्षण...
अवघे जग फाईव्ह जी या तंत्रज्ञानाच्या मोहामध्ये अडकले असले, तरी आजही आपल्या देशात गुरू‘जी’ या ज्ञानमहर्षिंचे महत्व अजिबात कमी होत नाही. गुढीपाडव्‍याच्या मुहूर्तावर पालक उत्तम शाळा मिळण्यासाठी धडपडत असतात. प्रत्येकाला हवी तशी शाळा मिळेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे पालकांनी सजग होऊन शाळा प्रवेशाचा निर्णय घेणे अनिवार्य बनले आहे. मूल शाळेत प्रवेश केल्यानंतर शाळेची एकूण इमारत पाहण्यापेक्षा वर्ग वातावरण कसे आहे ते पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. माध्यम कोणतेही असो. आपणास माध्यम आणि तिथले वातावरण अवगत होणे गरजेचे आहे.
...................

आजचा पालक जागरूक आहे. पाल्यावर अत्यंत प्रेम, स्नेह, जिव्हाळा, आपुलकी या सर्व बाबींची त्याला चांगली जाण आहे. छोट्या कुटुंबाच्या व्याख्येमुळे हमारे दो अथवा हमारा एक असे वास्तव घरोघरी दिसत आहे. पाल्याचा विकास म्हणजे नेमके काय याची परिपूर्ण जाणीव त्याला आहे. आपल्याला ज्या सुविधा मिळाल्या नाहीत त्या आपल्या पाल्यास मिळाव्या किंबहुना आपली स्वप्ने त्याच्या डोळ्यातून पहाण्याची विशाल दृष्टी आजच्या पालकांकडे आहे. पळा पळा कोण पुढे पळे तो.. या स्पर्धेत पालक स्वतःही पळत आहे. चक्रव्यूह भेदण्याचे कौशल्य अभिमन्युने गर्भात असतानाच प्राप्त केले हा इतिहास सर्वांना ज्ञात आहे. आपले मूल अभिमन्यू व्हावे असे आज प्रत्येकास वाटते. मूल जन्माला आल्यानंतर त्याची पंच ज्ञानेंद्रिये हळूहळू विकसित होतात. स्पर्शज्ञान दृढ होते. बाळ ज्यावेळी घरात रांगावयास सुरुवात करते त्याचवेळी पालक नाव नोंदणीसाठी शाळांच्या दारात रांगा लावत असतात असे विनोदाने म्हटले जाते तरीही थोड्याफार फरकाने अशी स्थिती गावोगावी आणि शहरोशहरी आढळत आहे.

वर्ग कसा निवडावा?
बालकाच्या सर्वांगिण विकासाला पोषक, प्रेरक आणि उत्साही वर्ग कुठे असेल हे आत्ताच्या व्यवहारवादी दुनियेतील अर्थशास्त्र सांभाळणा-या पालकास चांगलेच ज्ञात आहे . गोष्टी, गाणी, खेळ विविध उपक्रम अशा बाबी आपला पाल्य ज्या शाळेत जाणार आहे त्या शाळेत आहेत का याची खात्री करा. सृजनशील शिक्षणासाठी या बाबी गरजेच्या आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्याकडे मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते. शिक्षणाच्या प्रारंभासाठी हाच दिवस शुभदिन म्हणून निवडतो. शिक्षणाचा आरंभ आणि योग्य प्रारंभ सर्वांनाच दिशादर्शक ठरो आणि यशदायी गुढी आश्वासक पाऊलवाटेला आत्मविश्वासाचे बळ देवो ही शुभकामना
प्रत्येक बालकास नव प्रवेशासाठी शाळा खुणावत आहे.
‘या बाळांनो, या रे या..
लवकर भरभर सारे या..
मजा करा रे मजा करा
आज दिवस तुमचा समजा
वर्गातील किलबिलाट पुन्हा होवू द्या. पाखरांचा चिवचिवाट पुन्हा होवू द्या.
- संजय एस. सौंदलगे, मुख्याध्यापक, कोल्हापूर
...............................................................
बालोद्यान पद्धत
किंडर गार्टन अर्थात केजी हा वर्ग प्रवेश प्रक्रियेचा भाग म्हणून आपण पाहतो. वास्तविक किंडर म्हणजे बालक आणि गार्टन म्हणजे बाग किंवा उद्यान. अर्थात बालोद्यान. या बालोद्यानामधील रोपट्यांची जोपासना करणारा माळी हा शिक्षक असतो. त्याला पाल्याचा सर्वांगीण विकास करावयाचा असतो. प्रत्येक बालक ईश्वरी अंश आहे, असे समजून वर्गातील शिक्षकांनी त्याला आवश्यक ते प्रेम दिले पाहिजे. मायेने अनेक गोष्टींमध्ये गुंतवून ठेवले पाहिजे त्यांच्यासाठी मनोरंजक खेळांची सुविधा केली पाहिजे. कारण या खेळामुळेच बालकांच्या इंद्रियांचा योग्य तो विकास होतो. या गटातील मुले कृतीयुक्त असतात. त्यांचे हात कोणतीही कृती करण्यासाठी आसुसलेले असतात. या गटात मुलांना कागदाच्या घड्यांचे विविधांगी आकार, आकृती, रेघा मारणे, लहान मोठा फरक ओळखणे, बडबड गीत म्हणणे, शिक्षकांच्या प्रत्येक कृतीचे निरिक्षण करणे, शरीराची स्वच्छता, चांगले संस्कार अंगीकारणे अशा सवयी शिकत असते.
..........................................................
मॉंटेसरी (शिशू शिक्षण)
इटलीमधील मादाम माँटेसरी यांनी बालकेंद्रित शिक्षणाचा वेगळ्या पद्धतीने विचार केला . त्या स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी सर्वसाधारण मुलांच्या शिक्षणात ज्ञानेंद्रिये महत्त्वाची भूमिका बजावतात, हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले. भारतात १९१४ रोजी असे माँटेसरी स्कूल (बालमंदिर) मद्रासजवळ सुरु झाले. अशा बाल मंदिरात दृष्टी, श्रवण, रूची, स्पर्श, स्वाद, गंध या ज्ञानेंद्रियांचा विकास करण्यावर भर देण्यात आला. या पद्धतीमध्ये शिक्षा आणि पारितोषिके यांना स्थान नाही. १९८६ च्या शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रामध्ये याच धर्तीवर अंगणवाड्या सुरु झाल्या. चांगल्या सवयीचे शिंपण करून मुलांना स्वावलंबी बनवण्याकडे या वर्गाचा कल राहिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com