
महसूल बदल्या
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या
बदल्यांना मिळणार गती
कोल्हापूर, ता. २० : कोरोनामुळे रखडलेल्या महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मार्चअखेर गती येणार आहे. बदल्यांच्या हालचाली सुरु झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चर्चेला ऊत आला आहे. जिल्ह्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. तहसीलदार, नायब तहसीलदार, प्रांतांचाही यामध्ये समावेश असून जिल्ह्यातील प्रभारी असणाऱ्या निवासी उपजिल्हाधिकारी पदावर हक्काचा अधिकारी मिळणार असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या सेवेला तीन ते चार वर्ष पूर्ण झाली आहेत. कोरोनामुळे राज्यासह जिल्ह्यातील बदल्या रखडल्या होत्या. याच बदल्यांचे संकेत मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा सुरु झाली आहे. कोणात्या अधिकाऱ्याची कोठे बदली होणार याचीही चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या इतरत्र बदल्या होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याला नवीन अधिकारी मिळणार आहेत. काही तहसीलदारांनी आपल्याला सोयीच्या जिल्ह्यात बदली व्हावी, यासाठी वर्षापासून फिल्डिंग लावली आहे. त्यानुसार त्यांचे कोरोना काळातही प्रयत्न सुरु होते. याला यश आले नव्हते. आता मात्र त्यांनीही प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. रखडलेल्या ठिकाणी बदली मिळते का, यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला संप आज मागे घेण्यात आला. त्यामुळे संपानंतर आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबद्दल चर्चेने जोर धरला आहे.