मनपा २५१ दुकान गाळे ताब्यात घेणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनपा २५१ दुकान गाळे ताब्यात घेणार
मनपा २५१ दुकान गाळे ताब्यात घेणार

मनपा २५१ दुकान गाळे ताब्यात घेणार

sakal_logo
By

ich206.jpg
-----------
मनपा २५१ दुकान गाळे ताब्यात घेणार
थकबाकी भरण्याच्या पर्यायाकडे दूर्लक्ष ः २७२ जणांनी घेतला लाभ ः २ कोटीहून अधिक भाडे जमा
पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २० ः महापालिका प्रशासनाकडून थकीत भाडे भरण्याबाबत दिलेल्या पर्यायाचा तब्बल २७२ दुकान गाळेधारकांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे थकीत भाडेपोटी सुमारे दोन कोटीहून अधिक महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. लाभ घेतलेल्या गाळेधारकांना आता लिलाव प्रक्रियेत भाग घेता येणार असून त्यांना प्रशासनाकडून विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. तर २५१ दुकान गाळेधारकांनी प्रशासनाने दिलेल्या पर्यायाकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे दुकान गाळे ताब्यात घेण्याची तातडीने प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.
इचलकरंजी महापालिकेच्या मालकीचे शहरात ६७२ दुकान गाळे आहेत. यातून महापालिकेला भाडे व अनामत यातून मोठे महसुली उत्पन्न मिळते. सध्या अनेक दुकान गाळ्यांची मुदत संपली आहे. मुल्यांकन न झाल्यामुळे काही वर्षापासून जुन्या दरानेच दुकान गाळेधारकांनी भाडे दिले आहे. मुल्यांकनानंतर मात्र मोठ्या प्रमाणात भाडेवाढ होवून थकबाकी वाढली आहे. ती भरताना दुकान गाळेधारकांची दमछाक होत आहे. महापालिका झाल्यामुळे पुढील सहा महिन्यात नविन भाडे निश्चिती होणार आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या दुकान गाळ्यांचा फेरलिलाव करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर थकबाकी वसुलीसाठी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दुकान गाळेधारकांना एक पर्याय उपलब्ध करुन दिला होता. मुदत संपलेल्या दुकान गाळेधारकांची दर तीन वर्षानी २५ टक्के भाडेवाढ करुन थकबाकी भरण्याचा पर्याय महापालिका प्रशासनाकडून दिला होता. त्याचा लाभ घेतल्यास फेर लिलाव प्रक्रीयेत मुळ गाळेधारकास प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक गाळेधारकांनी आपला गाळा आपल्याच ताब्यात राहण्यासाठी प्रशासनाचा पर्याय प्राधान्याने स्वीकारल्याचे समोर आले आहे. तब्बल २७२ दुकान गाळेधारकांनी बंधपत्र देत थकीत भाडे भरले आहे. ही रक्कम दोन कोटीपेक्षा जास्त आहे.
-------------------
१७ दुकानगाळे ‘ओपन’
थकीत भाडे भरण्यासाठी महापालिका प्रशासनाने तब्बल ५० दुकान गाळे सील केले होते. यातील १७ दुकानगाळेधारकांनी थकीत भाडे जमा केले आहे. त्यामुळे त्या गाळ्यांचे सील खुले केले आहेत तर उर्वरीत ३३ दुकान गाळे लवकरच ताब्यात घेतले जाणार आहेत. सध्या ८६ दुकान गाळे रिकामे आहेत. तर यापूर्वीच १६ दुकान गाळे फेरलिलावाने दिले आहेत. त्यामुळे एकूण ३०० हून अधिक दुकान गाळ्यांचे फेरलिलाव होणार आहेत.
--------------------
पोटभाडेकरु सापडले कोंडीत
दुकान गाळेधारकांना पोटभाडेकरु ठेवता येत नाही. पण अनेकांनी जादा भाडे घेवून पोटभाडेकरु ठेवले आहेत. त्यामुळे मुळ मालकांचा शोधच लागत नसल्यामुळे बहुतांशी पोटभाडेकरु यांची कोंडी झाली आहे. त्यांना दुकान गाळा खाली करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. तर विविध शासकीय कार्यालयांच्या ताब्यात असलेल्या १४ दुकान गाळ्यांचा मात्र फेरलिलाव होणार नाही.