
पेन्शन नको
90382
....
लोकांची पिळवणूक करणाऱ्यांबद्दल सहानुभूती नको
शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध एल्गार मोर्चा : जुनी पेन्शन लागू करू नये
कोल्हापूर, ता. २० : सरकारी काम आणि सहा महिने थांब, पाकीट घेतल्याशिवाय काम करणार नाहीत, कामाच्या तुलनेत पगार जास्त असल्याने शासकीय-निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करू नये, यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शनविरोधी कृती समितीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला. शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, पुंडलिक बिरंजे, राजेश नाईक आणि डॉ. नामदेव निटूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयदरम्यान काढलेल्या या मोर्चात अनेक तरुण सहभागी झाले.
रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘आमचाच पगार घेऊन आम्हाला वेठीस धरणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध आता रडायचं नाही तर सर्वांनी लढायचं. राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी (सैन्याव्यतिरिक्त) व लोकप्रतिनिधींची जुनी पेन्शन बंद करून महाराष्ट्र वाचवला पाहिजे. बक्कळ पगार, वेळेत काम करणार नाहीत, लोकांची पिळणूक करणार अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करू नका. सैन्य दलातील जवानांव्यतिरिक्त इतर कोणालाही जुनी पेन्शन देऊ नये. सरकारी कार्यालयांत एकही काम पाकीट घेतल्याशिवाय केले जात नाही. सर्वसामान्य लोकांची पिळवणूक केली जाते. गलेलठ्ठ पगार असतानाही लोकांकडून चिरीमिरी घेऊन कामे करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल कोणालाही सहानुभूती नाही. त्यामुळे सरकारनेही त्यांना सहानुभूती दाखवू नये. आज अनेक लोक याच कर्मचाऱ्यांविरोधात उघड भूमिका घेत आहेत. लोकांची पिळवणूक करत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांबद्दल लोकांमध्ये प्रचंड राग आहे. सरकारने हा राग ओळखून त्यांना पेन्शन देऊ नये. याउलट अशा कर्मचाऱ्यांना घरी पाठवून बेरोजगार तरुणांना नोकरीत संधी द्यावी.’
दरम्यान, दसरा चौकापासून निघालेला मोर्चा स्टेशन रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला. तेथे जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली.