
निवडणूक २८ तारखेला सुनावणी
स्थानिक स्वराज्य संस्था
निवडणूक, सुनावणी लांबणीवर
कोल्हापूर, ता. २१ ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची सर्वोच्च न्यायालयातील आज होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. आता २८ मार्चची तारीख दिली असून त्यादिवशीही सुनावणी होणार का याची साशंकता आहे. पुढील महिन्यात सुनावणी जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दोनच महिन्यात पावसाला सुरूवात होणार असल्याने निवडणुका दिवाळीच्या दरम्यान होऊ शकतात.
सर्वोच्च न्यायालयाने २१ मार्चची तारीख सुनावणीसाठी दिली होती. राज्याच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ते उपस्थित राहिले नसल्याने ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन तारीख २८ मार्च दिली आहे. मात्र मंगळवारपासून घटनापीठाचे कामकाज सुरू होणार आहे. त्यासमोर देशातील इतर खटल्यांची सुनावणी होणार आहे. त्यामुळे निवडणुकीबाबतची सुनावणी होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. जर सुनावणी झाली नाही तर पुढील महिन्यात ही सुनावणी जाण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये सुनावणी होऊन न्यायालयाने आदेश दिले तर त्यानंतर कार्यवाही सुरू होईल.
मध्यंतरी विविध संस्थांच्या निवडणुकीच्या राबवलेल्या प्रक्रिया राज्य सरकारने रद्द केल्या आहेत. त्यामुळे न्यायालय काय आदेश देते यावर बरेच अवलंबून आहे. सर्व प्रक्रिया पुन्हा राबवायची ठरवल्यास किमान तीन महिन्यांचा अवधी लागू शकतो. त्यानुसार पावसाळा झाल्यानंतर निवडणुकीचा मुख्य कार्यक्रम लागेल. दिवाळीदरम्यान मतदानाची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाळ्यापूर्वी निवडणूक लागण्याच्या शक्यतेने अनेक इच्छुकांनी तयारी करून ठेवली आहे. पण न्यायालयीन प्रक्रियेत किती काळ या निवडणूक अडकणार हे सांगता येत नसल्याने इच्छुकांकडून सावध पवित्रा घेतला जात आहे.
....
... तर पावसाळ्यापूर्वी महापालिका निवडणूक
महापालिकेने जुन्या प्रभागरचनेप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यात २०२१ ची लोकसंख्या गृहित धरून नगरसेवक व प्रभागांची रचना केली होती. जर न्यायालयाने पूर्वीची ही प्रक्रिया कायम ठेवली तर महापालिका निवडणुकीचा मुख्य कार्यक्रम राबवणे शिल्लक राहणार आहे. त्यामुळे ४५ दिवसांची निवडणूक प्रक्रिया राबवताना पावसाळ्यापूर्वी निवडणूक घेतली जाऊ शकते. पण न्यायालय कशा पद्धतीने आदेश देते व त्यानंतर राज्य निवडणूक आयोग काय आदेश काढणार, यावर सारे अवलंबून आहे.